सातारा: माण तालुक्यातील मोगराळे गावच्या हद्दीत सोलर कंपनीच्या जवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. बिबट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली. याआधीही बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती सोलर कंपनी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र कोणताही पुरावा नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या दिसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी सोलर कंपनी जवळील डोंगर पट्ट्यात एकटे फिरू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.