चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान सध्या ४१ अंशांच्यावर पार गेले असून सूर्य जणू आग ओकत आहे. अशा परिस्थितीत शेती करणे जिथे कठीण झाले आहे, तिथे पोंभुर्णा तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र शेतात नंदनवन फुलवले आहे. कापूस आणि सोयाबीनच्या चक्रातून बाहेर पडत या शेतकऱ्याने फुलांच्या शेतीतून आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकरी अर्जुन मरसकोल्हे यांनी अनोखा प्रयोग केला आहे.चंद्रपूरच्या या भीषण उष्णतेतही योग्य पाणी व्यवस्थापन, खत आणि वेळोवेळी फवारणीच्या जोरावर त्यांनी हे पीक टिकवून ठेवले आहे.आता फुलांच्या शेतीमुळे रोजचा नफा मिळत आहे. दररोज फुलांची तोडणी होते आणि पोंभुर्णा, गोंडपिपरी तसेच मूल येथील बाजारपेठेत ही फुले विकली जातात. कृषी विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे ते सांगतात.