धुळे जिल्ह्यातील अवकाळी पाऊस,वाढते तापमान आणि व्यापाऱ्यांची मनमानी यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.धुळे तालुक्यातील खर्दे येथील शेतकरी भरत गुजर यांनी तीन एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली होती.मात्र,पपईला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.सध्या वाढत्या उष्णतेमुळे पपई खराब होऊ लागली होती. व्यापारी कमी दर देत असल्याने माल खरेदी करण्यास तयार नव्हते.त्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी भरत गुजर यांनी संपूर्ण पपईचे क्षेत्र चारण बांधवांना जनावरांच्या चाऱ्यासाठी देऊन टाकले. कष्टाने उभे केलेले पीक जनावरांच्या चाऱ्यासाठी द्यावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.