सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळ्यात पावसाने पुन्हा एकदा पर्यटकांना भुरळ घातली असून पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुशी डॅमवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. एका बाजूला रिमझिम पावसाच्या सरी, धुक्याची दुलई आणि थंडगार वाऱ्याचा स्पर्श, तर दुसऱ्या बाजूला धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात मनसोक्त आनंद लुटणारे पर्यटक,अशा उत्साही वातावरणाने भुशी धरण परिसर फुलून गेला आहे. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्याकडे धाव घेत असून भुशी धरण,लायन्स पॉइंट,टायगर पॉइंट आणि इतर पर्यटनस्थळांवरही मोठी गर्दी होत आहे.पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक सेल्फी काढत पावसात भिजण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र,निसर्गाचा आनंद लुटताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.