परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील जागृत श्री सोमेश्वर देवस्थान जिरेवाडी येथे देवस्थानच्या कामकाजात अध्यक्ष व सचिव यांनी आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी परळी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून ग्रामस्थांचा निर्धार कायम आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार देवस्थानच्या निधीच्या वापराबाबत पारदर्शकता नसून विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.