जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गिरड शिवारात ऊसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊसतोडणी सुरू असताना मजुरांना ही बछडे दिसून आले. याची माहिती शेतमालकांना देताच तात्काळ ऊसतोडणीचे काम बंद करण्यात आले. गेल्या आठवड्यापासून गिरड व परिसरात बिबट्याचा संचार वाढला असून पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीतही बिबट्या दिसून आला होता. यापूर्वी अंतुर्ली व भातखंडे परिसरात बिबट्याने गाय व वासरावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी व मजूर शेतात जाण्यास घाबरत असून शेतीची कामे रखडली आहेत.