गणेशोत्सव हा सण देशभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो.यंदाचा गणेश उत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी प्रत्येक भाविकाच्या घरी आणि मंडळामध्ये सुरू आहे.हा गणेशोत्सव प्रत्येक भागात आपल्या रुढी परंपरानुसार साजरा केला जातो.त्यामध्ये कोकणातील गणेशोत्सव एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि त्याची चर्चा सर्वत्र असते.कोकणातील गणेशोत्सव पाहण्यास विशेष करून अनेक भाविक जात असतात.तर याच कोकणातील हजारो नागरिक व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्त राज्याच्या कानाकोपर्यात असतो. पण हाच कोकणातील बांधव गणेशोत्सव आपल्या कुटुंबीय सोबत गावी साजरा करण्यास जात असतो. याच भाविकांसाठी मागील 25 वर्षापासून पुणे शहरातील कळस धानोरी भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना आपल्या कोकणात जाऊन गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोफत बस प्रवासाची व्यवस्था केली आहे.