नाशिक जिल्ह्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळलं आहे. बागलाण तालुक्यात सोमवारी सायंकाळी,रात्री झालेल्या भीषण गारपिटीने आणि वादळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढलंय. या अवकाळी पावसामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला असून शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. बागलाण तालुक्यात जणू आभाळ फाटलं. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या प्रचंड गारपिटीने सटाणा शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढलं. या अवकाळी तडाख्यामुळे कांदा, कांदा बियाणे, गहू यांसारखी रब्बी पिके तर उद्ध्वस्त झालीच, पण कांदा आंबा, पपई, डाळिंब आणि द्राक्ष बागाही मातीमोल झाल्या आहेत. लाखो रुपये खर्च करून उभा केलेला हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.