दीपावली सणाची सुरुवात वसुबारसने होत असते. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचे स्थान असून वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे.या परंपरेनुसार येवला शहरातील संस्कार धेनू गोशाळेत येवलेकर उपस्थित राहून गोमातेचे आणि वासराचे विधिवत पूजन केले. गायीला ओवाळून, हळद-कुंकू लावून तसेच नैवेद्य अर्पण करून नागरिकांनी गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त केली यंदा परिसरात दुष्काळाचे सावट असल्याने त्याचा परिणाम जनावरांच्या चाऱ्यावरही झाला आहे. पावसाअभावी चाऱ्याचे उत्पादन घटल्याने गोशाळांमध्ये चाऱ्याची भीषण टंचाई जाणवत आहे. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती संस्कार गोशाळेच्या संचालकांनी यावेळी दिली. वसुबारसच्या निमित्ताने गोमातेचे पूजन करतानाच गोवंश संवर्धन आणि त्यांच्या चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरजही यानिमित्ताने अधोरेखित झाली.