गणेशोत्सव आणि गौरीपूजन हे सण केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून कलेचा, सृजनशीलतेचा आणि पारंपरिकतेचा संगम घडवून आणणारे मानले जातात. याच पार्श्वभूमीवर शेलूबाजार येथील साईनगरातील रहिवासी पांडुरंग बेद्रे व जयश्री बेद्रे या दाम्पत्याने यंदाही त्यांच्या अनोख्या कलाकृतीने पंचक्रोशीत चर्चेचा विषय निर्माण केला आहे. यावर्षी त्यांनी समुद्र तळाचे दृश्य या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. समुद्रात वावरणारे जलचर प्राणी, रंगीबेरंगी शंख-शिंपले, प्रवाळ खडक आणि उसळणाऱ्या निळ्याशार लाटांचे देखणे चित्रण करीत त्यांनी भाविकांना एक अद्वितीय अनुभव दिला आहे. पारंपरिक हस्तकलेचा नाजूक स्पर्श आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड यामुळे हा देखावा अधिकच उठावदार ठरतो आहे.