साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीया सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने,पुण्याच्या भोरमधील उत्रौलीच्या कुंभार वाड्यात पूजेसाठी लागणारे मातीचे घट बनविण्याची लगबग सुरू आहे. अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी-विष्णू पूजनासोबतच शेतीतील मशागत केलेल्या जमिनीतील मातीचे म्हणजे ( घट ) आखीतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. मशागत केलेल्या जमिनीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा,नैवेद्य आणि शेती अवजारांची पूजा केली जाते.तसेच पुर्वजांचे स्मरण करुन त्यांची विधिवत पूजा केली जाते. याच पार्श्वभूमीवर सध्या कुंभार वाड्यात ठिकठिकाणी वारुळाची माती,काळी माती,तांबडी माती,घोड्याची लिद,राख चाळणीने एकजीव करुन मातीचा गोळा तयार करून फिरत्या चाकावर गोळा ठेवून कारागीर हाताने आकार देऊन आखीती तयार करतात. बाजारात आखीती नरमादीच्या जोडीला ६० ते ७० रुपये भाव मिळत आहे. चांगला दर मिळतं असल्याने कारागिरही समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.