अमित शाहांनी सात वर्षांपूर्वी म्हटलेला शेर देवेंद्र फडणवीसांकडून कॉपी

2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शाहांनी म्हटलेला शेर देवेंद्र फडणवीसांनी पेश केला.

अमित शाहांनी सात वर्षांपूर्वी म्हटलेला शेर देवेंद्र फडणवीसांकडून कॉपी

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेर सादर करत उपस्थित आमदारांची वाहवा मिळवली. फडणवीसांच्या गाजलेल्या ‘मी पुन्हा येईन’ या ओळीशी साधर्म्य असलेली ‘मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊंगा’ हा तो शेर होता. मात्र हा शेर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सात वर्षांपूर्वी गुजरातमध्ये म्हटल्याचं (Devendra Fadnavis Copies Amit Shah Sher) समोर आलं आहे.

‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यासारख्या नेत्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. या अभिनंदनाला किनार होती शालजोडीतली वाक्यं, टोले, चिमटे, यांची.

‘मी निश्चितपणे सांगितलं होतं, की मी परत येईन. अभिनंदनाचे ठराव म्हणजे ‘शोले’ चित्रपटासारखे होते. अमिताभ बच्चन धर्मेंद्रचं लग्नात जसं कौतुक करतो, ‘लडका तो अच्छा है’ अशी डायलॉगबाजी फडणवीसांनी केली. ‘महाराष्ट्राच्या जनतेने मला परत आणलं, 105 निवडून दिले, सर्वात मोठा पक्ष, जनादेश तोच होता. मी पुन्हा येईन, पण वेळ सांगितली नव्हती, त्यामुळे वाट बघा’ असंही फडणवीस म्हणाले. त्यानंतर…

मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा देना
मै समंदर हू, लौटकर वापस आऊंगा

हा शेर देवेंद्र फडणवीस यांनी पेश करताच ‘भारत माता की जय,’ ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी सभागृह दणाणलं.

या शेरो-शायरीची चर्चा सोशल मीडियावर रंगली नसती, तरच नवल. अमित शाह यांनी सात वर्षांपूर्वी हा शेर गुजरातमध्ये म्हटला होता. आता तोच देवेंद्र फडणवीसांनी सादर करत पुनरागमनाचे संकेत दिले.

अमित शाहांनी का म्हटला होता हा शेर?

ही सात वर्षांपूर्वीची गोष्ट (Devendra Fadnavis Copies Amit Shah Sher) आहे. त्यावेळी देशात यूपीए 2 ची सत्ता होती. पी चिदंबरम त्यावेळी देशाचे गृहमंत्री होते. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर शिवराज पाटील यांना हटवून पी चिदंबरम यांच्याकडे गृह मंत्रालयाची कमान देण्यात आली होती. त्यावेळी सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण चर्चेत होते. या प्रकरणात सीबीआयने अमित शाहांवर आरोप केले होते.

भुजबळसाहेब, तुमच्यासकट पुन्हा येईन : देवेंद्र फडणवीस

25 जुलै 2010 रोजी या प्रकरणात अमित शाह यांना सीबीआयने अटक केली होती. अटकेपूर्वी अमित शाह यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात आपल्यावर लावलेले आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला होता. हे प्रकरण न्यायालयात टिकणार नाही, असंही ते म्हणाले होते.

सीबीआयच्या अटकेच्या अगोदर अमित शाह 4 दिवस बेपत्ता होते. या प्रकरणात अमित शहा यांना तीन महिने तुरुंगात राहावे लागले होते. 29 ऑक्टोबर 2010 रोजी त्यांना जामीन मिळाला. परंतु जामीन मिळाल्यानंतरही त्यांना गुजरातमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

अमित शाह दोन वर्षे गुजरातबाहेर राहिले. 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना गुजरातमध्ये जाण्याची परवानगी मिळाली. ते गुजरातमध्ये एका बैठकीला आले आणि त्यांनी शेर वाचला होता.

मेरा पानी उतरता देख
किनारे पर घर मत बना लेना
मैं समंदर हूं
लौटकर जरूर आऊंगा

त्यावेळी पी चिदंबरम हे देशाचे गृहमंत्री होते आणि अमित शाह सीबीआयच्या तावडीत होते. आज अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि पी चिदंबरम सीबीआयच्या कचाट्यात आहेत. नऊ वर्षांनंतर एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं (Devendra Fadnavis Copies Amit Shah Sher) बोललं जात होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *