राष्ट्रवादीत धक्कातंत्र सुरूच, अवधूत तटकरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली

राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांचा पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे (Avadhut Tatkare) राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 8:06 AM, 9 Sep 2019

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) एकनिष्ठ राहिलेल्या तटकरे कुटुंबात धुमसणारा काका-पुतण्याचा वाद शिगेला पोहचला आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांचा पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे (Avadhut Tatkare) राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अवधूत तटकरे आज (9 सप्टेंबर) शिवबंधन बांधणार आहेत.

अवधूत तटकरे यांच्यासह श्रीवर्धनमधील त्यांचे काही खंदे कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत. तसेच माजी उपजिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बाळशेठ (भाऊ ) करडे यांचाही आज शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे.

भास्कर जाधवही शिवसेनेत?

अवधूत तटकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे देखील पक्षाला रामराम ठोकणार आहे. येत्या 13 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत जाणार आहेत.

काका-पुतण्याचा वाद महाराष्ट्रातील राजकारणात नवीन नाही. काही दिवसांपूर्वी सुनिल तटकरेंचे बंधू अनिल तटकरे यांचे पुत्र अवधूत तटकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत नाराजी उघड केली होती. त्याशिवाय गेल्या दिवसांपासून अवधूत यांच्या ‘मातोश्री’वर वाऱ्या सुरु होत्या. सुरुवातीला, केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगणाऱ्या अवधूत तटकरे यांनी राजकीय चर्चा झाल्याचं मान्य केलं. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय जाहीर करणार असल्याचं अवधूत याआधी म्हणाले होते. मात्र त्यानंतर अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आलं.

राष्ट्रवादीला भगदाड

याआधीच अनेक आमदार सोडचिठ्ठी देऊन युतीच्या वळचणीला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. नुकतंच राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

नेमका वाद काय?

अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध तणावाचे असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांच्या या भांडणात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता, पण याला फार यश आलं नाही. 2016 मध्ये अवधूत तटकरेंच्या धाकट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता.

सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत यांनी स्वतःची तयारी सुरु केली असल्याचं दिसत आहे.

याआधी खासदार सुनिल तटकरेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र तटकरेंनी हे दावे फेटाळून लावले होते.

कोण आहेत अवधूत तटकरे?

आमदार अवधूत तटकरे हे कुटुंबातील एक मोठं प्रस्थ आहे. श्रीवर्धनचे आमदार, रोह्याचे माजी नगराध्यक्ष, प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारं आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख. सुनिल तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत यांच्याकडे पाहिलं जातं. अवधूत यांच्या प्रचारापासून आदिती आणि अनिकेत तटकरे दूर राहिले.