तुम्ही मुलीपेक्षा जास्त प्रेम दिलंत, माँसाहेब-बाळासाहेबांच्या आठवणींनी सुप्रिया सुळे हळव्या

तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल, असं सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरेंविषयी लिहिलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:11 PM, 28 Nov 2019

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे (माँसाहेब) यांच्या आठवणींनी भावनाविवश झाल्या आहेत. सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी (Supriya Sule remembers Balasaheb) करुन दिली आहे.

‘माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खूप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल.’ असं सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस आणि ट्विटरवर लिहिलं आहे.

दोन भिन्न विचारधारांच्या पक्षांचं नेतृत्व करत असतानाही पवार आणि ठाकरे कुटुंबाचे कायमच जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीत शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करताना शरद पवारांनीही बाळासाहेबांची आठवण काढली होती.

‘आज बाळासाहेब असते तर आम्हा सर्वांना खूप आनंद झाला असता’, असं म्हणत शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या.

“मी, बाळासाहेब, जॉर्ज फर्नांडीस आम्ही एकत्र खूप काम केलं होतं. मी त्यांच्या घरी गेलो की उद्धव ठाकरे यांच्या आई म्हणजे मीनाताई या आमच्यासाठी चांगल्या खाण्याची सोय करत असत. त्यांना आम्ही ‘माँ’ म्हणायचो. ठाकरे आणि आमचे कौटुंबिक संबंध होते. बाळासाहेबांनी आपल्या राज्याला चांगलं नेतृत्व दिलं, आमचे स्नेही बाळासाहेब आज हयात नाहीत. पण अंतःकरणापासून त्यांचं स्मरण करतो आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतो,” असं शरद पवार यांनी म्हटलं.

2006 मध्ये शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. ‘महाराष्ट्राची लेक दिल्लीत जात आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुप्रिया आमच्यासमोर लहानाची मोठी झाली’ अशा भावना त्यावेळी बाळासाहेबांनी व्यक्त (Supriya Sule remembers Balasaheb) केल्या होत्या.