दीपावली शब्दउत्पत्ती

दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. 

"दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात. 

शास्त्रानुसार शुद्ध शब्द हा दीपावली असाच आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे. दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते, हे हेमचंद्राने नोंदवले आहे.

वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदवण्यात आले आहे. नीलमत पुराण या ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने एका नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" म्हटले आहे.

ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दीपालिका" म्हटले आहे. तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो.