कोकणातील 'ही' ठिकाणं नक्की पहा

तारकर्ली समुद्रकिनारा

या समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग आणि इतर उपक्रम सुरु करण्यात आलेत. या ठिकाणी डॉल्फिनही असल्यामुळे त्यांना बघण्यासाठीही अनेक जण तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. दिवसा साधारण २० फूट खोलीपर्यंत तुम्ही पाणी पाहू शकता इतकी स्वच्छता या पाण्यामध्ये आहे.

गणपतीपुळे मंदिर

समुद्र, चंदेरी वाळूचा लांबच लांब किनारा,आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ४०० वर्षांचे जुने स्वयंभू गणेश मंदिर ही या गावाची वैशिष्ठ्ये आहेत. समुद्राची शांत गाज, मंद वारा, डोंगर उशाशी घेऊन बसलेले गणेश मंदिर, चाहोबाजूने हिरवाई असलेले हे गांव खास कोकणी खेडे आहे. 

हरिहरेश्वर

चिंचोळे रस्ते, अजूनही शहरीकरण न झालेलं हरिहरेश्वर गाव आणि समुद्राची कानी पडणारी गाज. या गावात पोचताच इथलं साधेपणा तुम्हाला आपलासा वाटू लागतो. दरवर्षी कुटुंबाला एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला नेणं जरा कठीणच आणि रिसोर्ट्स पिकनिक्सचाही कंटाळा आला असेल तर हरिहरेश्वरला नक्कीच भेट द्यायला हवी.

थिबा राजवाडा

रत्नागिरीमध्ये हा थिबा राजवाडा असून यामध्ये एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. आताचे म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रम्हदेशाच्या थिबा मिन राजाला येथे नजरकैदेत ठेवण्यात आलं होते.  त्यांनी वापरलेल्या अनेक गोष्टी इथं जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. हा राजवाडा ब्रिटिशांनी बांधला असून आता पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

धुतपापेश्वर

धुतपापेश्वर हे शांत आणि डोंगराच्या मधोमध असणारं काळ्या पाषाणातील शिवलिंग असणारं निसर्गाचं अप्रतिम ठिकाण. पेशवेकालीन बांधकाम या मंदिरात असून इथे लाकडात खूपच आकर्षक काम करण्यात आलय. हे मंदिर पुरातन असून सहसा पावसाळ्याच्या दिवसात येथील धबधबा बघण्यासाठी अनेक पर्यटक जातात.