मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधक लबाडी करत असून, त्यांचा खरा विरोध डीलिमिटेशनला नसून महिला आरक्षणाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 2029 पर्यंत लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा आरक्षित ठेवल्या जातील, असे फडणवीस यांनी नमूद केले. 2023 मध्ये नारी शक्ती वंदन विधेयक सादर झाले, तेव्हा त्यात महिला आरक्षण लागू करण्यासाठी डीलिमिटेशन आवश्यक असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते.
त्यावेळी विरोधी पक्षांनी या विधेयकाला एकमताने पाठिंबा दिला होता, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. तेव्हा डीलिमिटेशन होणार आहे हे माहिती असूनही समर्थन देणाऱ्या विरोधकांना आता मोदी सरकार महिला आरक्षण लागू करत असताना विरोध का करावा लागतो, असा सवाल फडणवीस यांनी केला. तुमचा विरोध या विधेयकाला नाही, तर महिलांना आहे, असे ते म्हणाले. महिलांना आरक्षण देण्याचा मोदीजींनी घेतलेला निर्णय विरोधकांना जळजळतो आहे, त्यामुळे त्यांची ही महिलाविरोधी मानसिकता समोर येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.