नंदुरबारच्या मिरची बाजारपेठेत विक्रमी आवक

×

नंदुरबारच्या मिरची बाजारपेठेत विक्रमी आवक

राज्यातील ओल्या लाल मिरचीची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मिरचीची विक्रमी आवक होताना दिसत आहे. दररोज साधारण अडीचशे ते तीनशे वाहनांतून मिरचीची आवक होत असताना, आज चक्क ८०० वाहनांतून आठ हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची आवक झाली आहे. त्यामुळे नंदुरबार बाजार समितीत मिरचीची मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतर नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या टंचाईवर मात करत शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक फुलवले आहे. विशेष म्हणजे, हंगाम लवकर आटोपण्याची शक्यता व्यक्त होत असतानाही सध्या बाजारपेठेत मिरचीची विक्रमी आवक होत आहे. अकोला लाल मिरचीला प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपासून ते नऊ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. नंदुरबार बाजार समितीत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर मध्य प्रदेश आणि गुजरातमधूनही शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरची विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे नंदुरबारची मिरची बाजारपेठ पुन्हा एकदा राज्यासह शेजारील राज्यांतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे.

 

KALYAN DESHMUKH