चिपळूण शहरालगतच्या चार गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गढूळ व मचूळ पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन नगरपरिषदेने दिल्यानंतर यापूर्वी सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले होते.
नगरसेवक साजिद सरगुरो यांच्या माध्यमातून नगरपरिषदेने प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत अपेक्षित काम पूर्ण न झाल्याने नागरिकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यापूर्वी नागरिकांनी दिला होता. अखेर आज स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी पुन्हा आंदोलन सुरू करत जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात केली आहे.
या आंदोलनाला महाविकास आघाडीनेही पाठिंबा दर्शविला आहे. चिपळूण शहराच्या आजूबाजूच्या चार गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने नगरपरिषद प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे.