31 ऑक्टोबर 2026
Created By: Bhakti Gothankar
जगात अनेक महागड्या वस्तू आहेत, पण एखाद्या फळाची किंमत लाखोंमध्ये असू शकते, याची कल्पनाही तुम्ही केली नसेल! जपानमध्ये मिळणाऱ्या एका खास खरबुजाची किंमत 34 लाख रूपये आहे.
या फळाचं नाव आहे 'युबारी किंग मेलन'. हे जपानमधील प्रसिद्ध खरबूज असून त्याच्या खास चवीमुळे आणि दर्जामुळे जगभरात ओळखलं जातं. दिसायला साध्या खरबुजासारखं असलं तरी त्याची किंमत लाखांमध्ये आहे.
युबारी किंग मेलनची लागवड जपानमधील होक्काइडो बेटावरील युबारी शहरात केली जाते. या शहराच्या नावावरूनच या फळाला 'युबारी मेलन' असं नाव मिळालं आहे.
या खरबुजाचा आकार गोल आणि बाहेरील सालीवर जाळीसारखी सुंदर नक्षी दिसते. फळ कापल्यानंतर आतमध्ये केशरी गर असतो. त्याचा रंग, सुगंध आणि रसाळपणा यामुळे हे फळ इतर खरबुजांपेक्षा वेगळं ठरतं.
युबारी किंग मेलन त्याच्या गोडसर चवीसाठी प्रसिद्ध आहे. याचा गर मऊ, रसाळ आणि सुगंधी असतो. फळाचा आकार, गोडवा, रंग आणि बाहेरील नक्षी यावर त्याचा दर्जा ठरवला जातो.
मे 2026 मध्ये जपानमधील हंगामाच्या पहिल्या लिलावात युबारी मेलनच्या दोन नगांना 58 लाख येन म्हणजेच अंदाजे 34 लाख रुपये मिळाले. या लिलावामुळे हे फळ पुन्हा एकदा चर्चेत आलं.
या फळाची लागवड आणि निवड अतिशय काळजीपूर्वक केली जाते. त्याचा मर्यादित पुरवठा, उत्तम दर्जा आणि जपानमधील प्रतिष्ठा यामुळे त्याला मोठी मागणी असते. विशेषतः हंगामातील पहिल्या लिलावात खरेदीदार मोठी बोली लावतात.
जपानमध्ये युबारी किंग मेलन हे केवळ खाण्याचं फळ नसून प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे खास प्रसंगी हे फळ भेट म्हणून दिलं जातं. आता सांगा, एवढ्या महागड्या फळाची चव चाखण्यासाठी तुम्ही लाखो रुपये खर्च कराल का?