PM Kisan : पीएम किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांच्या नावाची निवड कशी होते? वाचा सविस्तर

| Updated on: Jul 03, 2021 | 3:31 PM

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन टप्प्यात एका वर्षाला 6 हजार रुपये जारी केले जातात. आतापर्यंत 8 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.

PM Kisan : पीएम किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांच्या नावाची निवड कशी होते? वाचा सविस्तर
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर एका वर्षात सहा हजार रुपये पाठवते. हे सहा हजार रुपये तीन टप्प्यात 2-2 हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा वापर केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेबद्दल शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न असतात. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे कोट्यावधी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कशी तयार केली जाते. (PM Kisan Scheme know how farmers name selected for installment of Scheme)

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी तयार करतात?

पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवरील माहिती नुसार शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या रेकॉर्डची तपासणी केली जाते. लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जासोबत जोडलेल्या जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते, यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले जाते. केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या आतापर्यंतची ही सर्वात यशस्वी योजना समजली जाते.

शेतकऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं होतं?

शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यामधील जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. शेतकऱ्यांनी अर्ज सोबत जोडलेली कागदपत्रं योग्य असल्याचं समोर आल्यास त्याचे नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी मध्ये समाविष्ट केलं जातं. पोर्टलवर शेतकऱ्याच्या कुटुंबाविषयी माहिती अपलोड करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांची असते. लाभार्थी यादी मध्ये नाव समाविष्ट झाल्यानंतरच पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो.

किती जमीन असणारे शेतकरी अर्ज करू शकतात?

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार कोणताही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू झाली तेव्हा दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले होते.

पीएम किसानचा लाभ कुणाला मिळत नाही?

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी, डॉक्टर, इंजिनियर, दहा हजार रुपये पेन्शन मिळणारे सेवानिवृत्त कर्मचारी खासदार, आमदार हे या योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत. आतापर्यंत देशातील 11 कोटी 82 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

संबंधित बातम्या:

चंद्रकांत पाटील म्हणाले अमित शाहांना पत्र लिहिणार, उदय सामंत म्हणतात हा तर सहकार मोडण्याचा डाव

भारताच्या बासमती तांदळाचा जगभर डंका, 125 देशांमध्ये 30 हजार कोटींची निर्यात

(PM Kisan Scheme know how farmers name selected for installment of Scheme)