




































मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विधानसभेच्या सर्व 230 जागांवर 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. मध्यप्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 6 जानेवरारी 2024 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच राज्यात नवं सरकार स्थापन करावं लागणार आहे. काँग्रेस आणि भाजपच्या दरम्यान या निवडणुकीत मुख्य लढत असणार आहे. राज्यातील 230 जागांपैकी 148 जागा या खुल्या वर्गासाठी आहेत. तर अनुसूचित जाती 35 आणि अनुसूचित जमातीसाठी 47 जागा आरक्षित आहेत.
राज्यातील 5, 60, 60, 952 मतदार राज्यातील सत्तेचा फैसला करणार आहेत. राज्यात एकूण 5.6 कोटी मतदार आहेत. त्यात 2.88 पुरुष आणि 2.72 कोटी महिला आहेत. यात 22.36 लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. बहुजन समाज पार्टीने गोंडवाना गणतंत्र पार्टीशी युती केली आहे. तर समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि जेडीयूसह ऑल इंडिया मजलिस ए इत्तहादूल मुस्लिमीन (AIMIM) आदी पक्ष राज्यात नशीब अजमावत आहेत.
छत्तीसगडमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यापैकी 10 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 29 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. तर 51 जागा खुल्या वर्गासाठी आहेत. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी 20 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबर रोजी 70 जागांवर मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. राज्य विधानसभेचा कार्यकाळ 3 जानेवारी 2024 रोजी संपत आहे. त्यापूर्वीच राज्यात नवं सरकार स्थापन करण्यात येणार आहे.
राज्यात कुणाचं सरकार बनणार याचा फैसला राज्यातील 2 कोटी 3 लाख 60 हजार 240 मतदार करणार आहेत. यातील 1 कोटी 1 लाख 20 हजार 830 पुरुष मतदार आहेत. तर 1 कोटी 2 लाख 39 हजार 410 महिला मतदार आहेत. तर राज्यात 790 तृतियपंथी आहेत. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारे 18 लाख मतदार आहेत. राज्यात काँग्रेस आणि भाजप दरम्यान मुख्य लढत असणार आहे. मात्र, प्रादेशिक पक्ष किंगमेकरची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. बसपाने गोंडवाना गणतंत्र पार्टीशी युती केली आहे. राज्यात आम आदमी पार्टीसह छत्तीसगड जनता काँग्रेस (जोगी) आदी पक्षही मैदानात उतरले आहेत.
राजस्थान विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. राज्यातील विधानसभेच्या 200 जागांसाठी मतदान होणार आहे. यातील 33 जागा अनुसूचित जातीसाठी तर 25 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 142 जागा खुल्या वर्गासाठी आहेत. राज्यातील 200 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ 14 जानेवारी 2024 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे त्यापूर्वीच राज्यात नवं सरकार येणं आवश्यक आहे.
राज्यात 5 कोटी 26 लाख 80 हजार 545 मतदार आहेत. त्यात 2 कोटी 73 लाख 58 हजार 627 पुरुष आणि 2 कोटी 51 लाख 79 हजार 422 महिला आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे. बसपा, आरएलपी, सपा, बीटीपी, डावे आणि आरएलडी आदी पक्षही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आम आदमी पार्टी आणि एमआयएमनेही या निवडणुकीत नशीब अजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राजस्थानच्या साडे तीन दशकाच्या इतिहासात सत्तेच्या परिवर्तनाचा ट्रेंड राहिलेला आहे. राज्यात दर पाच वर्षाने सत्ता बदल होत असतो. भाजप आणि काँग्रेसमध्येच हा सत्ता बदल होत असतो.
तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. राज्यातील विधानसभेच्या 119 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. 119 विधानसभा मतदारसंघात 31 जागा राखीव आहेत. त्यात 12 जागा एसटीसाठी आणि 19 जागा एससीसाठी राखीव आहेत. तर 88 जागा खुल्या वर्गासाठी आहेत. तेलंगणा विधानसभेचा कार्यकाळ 16 जानेवारी 2024 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्यात त्यापूर्वीच सरकार स्थापन करणं आवश्यक आहे.
राज्यातील 3 कोटी 17 हजार मतदार आपल्या राज्याची सत्ता कुणाच्या हाती असेल याचा फैसला करणार आहे. 1 कोटी 58 लाख 71 हजार 493 पुरुष मतदार आणि 1 कोटी 58 लाख 43 हजार महिला मतदार राज्याचं नवं सरकार निवडणार आहेत. राज्यात 2 हजार 557 तृतियपंथी आहेत. काँग्रेस आणि केसीआर यांच्या बीआरएसमध्येच राज्यात मुख्य लढत आहे. तर भाजपचंही आव्हान राज्यात उभं राहण्याची शक्यता आहे. राज्यात बीआरएसची एमआयएमशी युती नाहीये. पण त्यांच्यात आतून साटंलोटं झालेलं आहे. या निवडणुकीत बसपाही पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे.
मिझोराममध्येही विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मिझोरामध्ये सर्व 40 जागांवर निवडणूक होत आहे. राज्यात एकाच टप्प्यात ही निवडणूक होत आहे. 7 नोव्हेंबर रोजी मिझोराममध्ये मतदान होईल. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या 40 जागांपैकी 39 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. एक सीट खुल्या वर्गासाठी आहे. मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ 17 डिसेंबर 2023 रोजी संपणार आहे. त्यामुळे राज्यात 17 डिसेंबरपूर्वीच नवं सरकार येणं क्रमप्राप्त आहे.
मिझोराममधील 8 लाख 51 हजार 895 मतदार मतदान करणार आहेत. या 8.51 लाख मतदारांमध्ये 4 लाख 12 हजार 969 पुरुष तर 4 लाख 38 हजार 925 महिला मतदार आहेत. तर राज्यात केवळ एकच तृतीयपंथी आहे. एमएनएफ, जेडपीएम, काँग्रेस आणि भाजप दरम्यान राज्यात मुख्य लढत होणार आहे. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने पिपल्स कॉन्फ्रेन्स आणि जोरम नॅशनॅलिस्ट पार्टीसोबत मिळून आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला ‘मिझोराम सेक्युलर अलान्स’ असं नाव देण्यात आलं आहे.