Rahul Gandhi : बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी? डीके शिवकुमार यांच्या मनात तरी काय?
Bihar Election Result 2025: बिहार निकालानंतर अवघ्या 24 तासात त्याचे साईड इफेक्ट दिसायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना कर्नाटकमधील वादळाची आशंका एव्हाना आलीच असेल.

Karnataka Siddaramaiah DK Shivakumar CM Post Tussle: बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाले. या निकालाचे साईड इफेक्ट थेट कर्नाटकात दिसत आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना कर्नाटकामधील वादळाची पूर्वकल्पना होती. पण ते इतक्या लवकर धडकेल याची शक्यता त्यांना वाटली नाही. बिहार निवडणुकीत काँग्रेस 6 जागांमध्येच आटोपली. यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता पक्षातील अंतर्गत वाद समोर येत आहेत. बिहार निकालाच्या अवघ्या 24 तासात कर्नाटकात त्याचा ट्रेलर दिसला. काय आहे मोठी घडामोड?
कर्नाटक मुख्यमंत्री पदावरून लढाई
कर्नाटक काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात या पदावरून रस्सीखेच सुरू आहे. दोघांतील वाद काही लपलेले नाहीत. शिवकुमार यांच्या गटानुसार, 2022 मध्ये राज्यात काँग्रेस बहुमताने निवडून आली. त्यावेळी मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे दोन्ही नेत्यांकडे देण्याचे ठरले होते. म्हणजे सुरुवातीला अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर सिद्धरमय्या असतील तर पुढील अडीच वर्षे हे पद शिवकुमार यांच्याकडे असेल. आता अडीच वर्षांचा हा कालावधी या महिन्यातच संपणार आहे. त्यामुळे डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात यावे. तर सिद्धरमय्या यांच्या समर्थकांनी असे काही ठरलेले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री पद सोडण्याचा प्रश्नच येत नाही असा दावा केला आहे.
राहुल गांधींचा अडचणीचा काळ संपेना
बिहार निवडणूक निकाल लागून 24 तासही उलटले नाही तोच सिद्धरमय्या आणि शिवकुमार हे दोन्ही शनिवारी दिल्लीत डेरेदाखल झाले. सिद्धरमय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. ही भेट अवघ्या 15 ते 20 मिनिटं चालली. कर्नाटक काँग्रेसचे दोन्ही प्रभावशाली नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या पुस्तकाच्या विमोचनालाही हजर झाले. दिल्लीत हा कार्यक्रम झाला.
कर्नाटकातील काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बंगळुरूमध्ये दिल्ली दौरा करणार असल्याचे आणि त्यात मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी चर्चा करणार असल्याचा दावा केला होता. मंत्रिमंडळ फेरबदलाआड कोण कुणाचा पत्ता कापणार ही चर्चा कर्नाटकमध्ये रंगली आहे. या बंडाळीचा भाजपला फायदा होणार का? याविषयी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा होत आहे.
