Maharashtra Election 2025: कुणाच्या बुथ बाहेर, तर कुठे उमेदवारांच्या नातेवाईकांकडून पैशांचं वाटप, राज्यात कुठे कुठे घडलं लक्ष्मी दर्शन?
Maharashtra Election 2025: राज्यातील विविध भागांमध्ये आज २ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र काही ठिकाणी मतदान केंद्राच्या परिसरात कॅश पकडली आहे. ही कॅश कुठे कुठे पकडली गेली? जाणून घ्या...

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतरदांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनच्या बिघाडामुळे गोंधळ झाला. तर काही ठिकाणी मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांना पैसे वाटताना पकडण्यात आले. काही ठिकाणी तर निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या घरातील व्यक्तींनी कॅशसोबत पकडले. राज्यात कुठे कुठे हा प्रकार घडला? चला जाणून घेऊया…
माथेरान येथ पकडली कॅश
रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपालिका हद्दीत निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना पाच लाख रुपयांची कॅश पकडण्यात आली आहे. ही कॅश पकडण्यात आलेल्या तरुणाची चौकशी सुरू आहे. हॉटेलचे पैसे आहेत अस या तरुणाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, माथेरान पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. लवकरच या बाबात माहिती समोर येईल.
अकोला जिल्ह्यात पैसे वाटल्याचा संशय
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाले आहेत. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यानंतर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला आहे. अकोट शहरातील बसस्थानकासमोरच्या नगर परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्राबाहेर हा प्रकार घडलाय. इतर विरोधी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी भाजपाच्या बूथबाहेर पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलाय. याप्रकरणी अकोट शहर पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतलंय. दरम्यान, अकोटमध्ये प्रशासनाच्या आशीर्वादाने भाजपच्या लोकांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चंचल पितांबरवाले यांनी केला आहे.
भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष
चंद्रपूरमधील राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडूरंग चिल्लावा पैसे वाटत असल्याचे कळल्यानंतर खळबळ माजली आहे. त्यांनी मतदानाच्या वेळेत 500 रूपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या बाबत निवडणूक विभागाकडे काँग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी तक्रार केली आहे. चिल्लावार यांच्या घराच्या मागे असलेल्या पिठाच्या चक्कीच्या शेड मधून हे पैसे वाटप होत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
बुलढाणा येथील खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 महेबुब नगरमध्ये मतदारांना पैसे वाटताना 50 हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. पैसे वाटप करणारे संबंधित तीन व्यक्ती फरार झाले आहेत. रोख रक्कम सोबत भाजपचे उमेदवार लक्ष्मण आयलाणी यांची डमी मतपत्रिका सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
बीडमध्ये बुथ परिसरात पैसे वाटल्याचा आरोप
बीडमधील माजलगाव शहरात मतदान प्रक्रिया सुरू असतानाच एका गटाने बुथ परिसरातच पैसे वाटल्याचा आरोप झाला आहे. यावरुन दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या लोकांना ताब्यात घेतले.
