विधानसभा निवडणूक निकाल 2026 LIVE
Election Live Blog
-
ममता बॅनर्जींचा पराभव करणे गरजेचे होते - सुवेंदू अधिकारी
-
भ्रष्टाचार करणाऱ्यांचा पराभव झाला - सुवेंदू अधिकारी
-
सर्वात मोठी बातमी! ममता बॅनर्जींचा भवानीपूरमधून पराभव
-
भाजपच्या विजयाचा इचलकरंजीत जल्लोष; कार्यकर्त्यांकडून साखर वाटप
-
पश्चिम बंगालमधील यशानंतर सिंधुदुर्गात भाजपचा जल्लोष
निवडणूक आयोगाने 15 मार्च रोजी 2026 मधील पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुडुचेरी येथील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. सर्व राज्यांमध्ये मतमोजणीची तारीख 4 मे निश्चित करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. तामिळनाडूमध्ये 234 सदस्यीय विधानसभा असून त्यासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होईल. केरळ, आसाम आणि पुडुचेरी येथे 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या 4 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमध्ये एकूण 824 विधानसभा जागा आहेत. या राज्यांमध्ये एकूण 17.4 कोटी मतदार असून 2.19 लाख मतदान केंद्रे आहेत.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी 2011 पासून राज्यात सत्तेत आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना 30 मार्च रोजी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 2 एप्रिल रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल असून उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल आणि उमेदवारी मागे घेण्याची तारीख 13 एप्रिल आहे. पहिल्या टप्प्यात 152 आणि दुसऱ्या टप्प्यात 142 जागांवर मतदान होईल.
केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागा आहेत. केरळमध्ये डाव्या पक्षांचे नेते पिनराई विजयन 2016 पासून मुख्यमंत्री असून एलडीएफ सरकारचे नेतृत्व करत आहेत.
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या एकूण 234 जागा असून द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन 7 मे 2021 पासून मुख्यमंत्री आहेत.
आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत. या ईशान्येतील राज्यात 2016 पासून भाजप सत्तेत असून हिमंत बिस्वा शर्मा 2021 पासून मुख्यमंत्री आहेत.
पुडुचेरीमध्ये मुख्यमंत्री एन. रंगासामी 2021 पासून सत्तेत आहेत. या केंद्रशासित प्रदेशात एकूण 33 जागा असून त्यात केंद्र सरकारकडून नामनिर्देशित 3 सदस्यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 7 मे रोजी, तामिळनाडूचा 10 मे रोजी, आसामचा 20 मे रोजी, केरळचा 23 मे रोजी आणि पुडुचेरीचा 15 जून रोजी संपणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 7.04 कोटी, तामिळनाडूमध्ये 5.67 कोटी, केरळमध्ये 2.7 कोटी, आसाममध्ये 2.5 कोटी आणि पुडुचेरीमध्ये 9.44 लाख मतदार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 750 ते 900 मतदार आहेत.
