Nitish Kumar: पहिल्यांदा पराभवाचा सामना आता दहाव्यांदा मुख्यमंत्री; धुरंधर नितीश कुमार यांचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.

Nitish Kumar Oath Taking Ceremony: बिहारचे राजकारण लालू प्रसाद यादव यांच्या भोवती फिरत असताना त्याच्या केंद्रस्थानी नितीश कुमार आपसूकच आले. ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं अशी त्यांची कारकीर्द आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांची बिहारच्या राजकारणावरील पकड भल्याभल्यांना कमी करता आली नाही. आंदोलक ते बिहारचे लोकप्रिय मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. जयप्रकाश नारायण यांच्यापासून ते पुढे जॉर्ज फर्नांडिस यांच्या तालामीत समाजवाद्याचे धडे गिरवत नितीश कुमार यांनी असे काही राजकीय डावपेच टाकले, अशी काही धक्कादायक समीकरणं मांडली की देशही अचंबित झाला. मित्र शत्रू झाले. तर शत्रू मित्र झाले पण नितीश कुमार यांच्याशिवाय बिहारच्या सत्तेचा मार्ग प्रशस्त होत नाही हे दिसून आले.
अशी आहे कारकीर्द
महाविद्यालयात असताना नितीश कुमार हे युनायटेड स्टुडंट्स फ्रंटसोबत काम करत होते. ही संघटना काँग्रेसविरोधात काम करत होती. नितीश कुमार यांच्या बोलण्याची शैली, नेतृत्व गुण याची त्यावेळी चर्चा झाली. 1972 मध्ये नितीश कुमार यांनी बिहारणध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक संघटना स्थापन केली. 22 फेब्रुवारी 1973 मध्ये त्यांनी नालंदा येथील मंजू कुमारी सिन्हा यांच्याशी लग्न केले.
लग्नानंतर शिक्षणही पूर्ण झाले आणि त्यांना विद्युत विभागात प्रशिक्षक अभियंता म्हणून नोकरी मिळाली. पण त्यांचे मन नौकरीत रमले नाही. त्यांनी राजीनामा दिला आणि ते थेट जेपींच्या आंदोलनात सहभागी झाले. तुरुंगा गेले. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी थेट निवडणुकीची तयारी केली. 1977 मध्ये पहिल्यांदा जनता पक्षाने 26 वर्षांचे नितीश कुमार यांना नालंदामधील हरनौत येथून तिकीट दिले. येथे नितीश कुमार यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1980 मध्ये नितीश पुन्हा त्याच मतदारसंघातून लढले आणि पुन्हा हारले. 1985 मध्ये त्यांनी शपथ घेतली की आता जर पराभव झाला तर पुन्हा निवडणूक लढणार नाही.
त्यांच्या पत्नी मंजू कुमारी यांनी त्यांना 20 हजार रुपये दिले. या निवडणुकीत ते 22 हजार मतांनी जिंकले. 1989 मध्ये लोकसभा निवडणूकही जिंकले. नितीश कुमार दिल्लीत आले. तर लालू प्रसाद यादव हे बिहारमध्येच थांबले. 1989 मध्ये बिहारमध्ये काँग्रेस सरकार होते. तर कर्पुरी ठाकूर हे विरोधी पक्ष नेते होते. 1988 मध्ये ठाकूर यांचे अचानक निधन झाले आणि लालू प्रसाद यादव हे विरोधी पक्ष नेते झाले. त्यावेळी नितीश कुमार यांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. 1990 मध्ये जेव्हा व्हीपी सिंह यांनी रामसुंदर दास यांना मुख्यमंत्री करण्याची कसरत सुरु केली तेव्हा नितीश कुमार यांनी लालूंना पाठिंबा दिला.
लालू प्रसाद यादव यांचे हनुमान
नितीश कुमार हे कायम लालू प्रसाद यांच्या पाठिशी राहिले. नितीश कुमार यांना लालूप्रसाद यादव यांचे हनुमान म्हणून ओळखल्या जाऊ लागले. ते लालूंचे अगदी खास, विश्वासू सहकारी होते. पण सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकळला. तर बाहेर दादगिरीचे प्रकार वाढल्याचे आरोप करत नितीश कुमार हे लालू प्रसाद यादव यांच्यापासून दुरावले. 1995 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यासमवेत त्यांनी समता पार्टी तयार केली आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर अनेक आरोप केले. पण या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले. तर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला 167 जागा मिळाल्या. तर 2000 मधील निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांना मोठा संघर्ष करत सत्ता स्थापन करता आली. या निवडणुकीने नितीश कुमार यांचे राज्यातील वर्चस्व वाढले. त्यांची लोकप्रियता वाढली. त्यावेळी नितीश कुमार यांच्यासह एनडीएला 122 जागा मिळाल्या. पण त्यांचे सरकार 7 दिवसांचेच ठरले. नितीश कुमार यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. राबडी देवी या मुख्यमंत्री आल्या.
बहुमत मिळवून मुख्यमंत्री
2005 मध्ये राष्ट्रपती राजवट हटवल्यानंतर पुन्हा बिहारमध्ये निवडणुका लागल्या. यावेळी भाजप जेडीयूला 143 जागा तर आरजेडीला 54 जागा मिळाल्या आणि मुख्यमंत्री होण्याचे नितीश कुमार यांचे स्वप्न पूर्ण झाले. नितीश कुमार यांनी बिहारमधील अराजक संपवण्याचा प्रयत्न केला. सुशासन आणण्यावर भर दिला. त्यांची लोकप्रियता शिगेला पोहचली आणि 2010 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.
नितीश कुमार यांचे सरकार
मार्च 2000 पहिल्यांदा मुख्यमंत्री
नोव्हेंबर 2005 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री
नोव्हेंबर 2010 तिसऱ्यांदा मुख्यमंत्री
फेब्रुवारी 2015 चौथ्यांदा नितीश राज
नोव्हेंबर 2015 पाचव्यांदा नितीश सरकार
जुलै 2017 मुख्यमंत्री पदाचा षटकार
नोव्हेंबर 2020 मध्ये पुन्हा नितीश सरकार
ऑगस्ट 2022 मध्ये लालू,काँग्रेससह नितीश सत्तेवर
जानेवारी 2024 मध्ये नितीश कुमार नव्यांदा सत्तेत
20 नोव्हेंबर 2025 मध्ये नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्री पदी
