वयाच्या २३ व्या वर्षी कृषी विभागाचे उपसंचालक, अशी घातली यशाला गवसणी

| Updated on: Sep 06, 2023 | 5:25 PM

या भागात कोणी अधिकारी झाला नाही. आनंद वाटतो. यावेळी प्रतीकच्या आईचा कंठ दाटून आला. आम्ही त्याचे आईबाबा असल्याचा अभिमान वाटतो, असंही प्रतीक पाटील यांची आई म्हणाली.

वयाच्या २३ व्या वर्षी कृषी विभागाचे उपसंचालक, अशी घातली यशाला गवसणी
Follow us on

कोल्हापूर, ६ सप्टेंबर २०२३  : जिल्ह्यातील इस्पुर्ली इथल्या प्रतीक पाटील यांनी अवघ्या 23 वर्षी कृषी विभागाच्या उपसंचालकपदी गवसणी घातली विशेष म्हणजे राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात प्रतीक यांनी हे यश मिळवलं. तळसंदे इथल्या डी वाय पाटील कृषी विद्यापीठातून बीएसस्सीची पदवी प्राप्त केलेला प्रतीक गावातील पहिलाच क्लासवन अधिकारी ठरला आहे. त्याच्या यशाचं गावात कौतुक होतंय. प्रतीकचे वडील गावचे माजी सरपंच आहेत. मात्र प्रतीकने वडिलांच्या मागे राजकारणात न जाता प्रशासकीय सेवेत यश मिळवत एक वेगळा संदेश देखील दिला आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना संधीदेखील आहे. मात्र थोडा संयम ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत देखील यश मिळवू शकतात, असं प्रतीकनं या यशानंतर म्हटलंय. तर, शेती आणि घरचे काम सांभाळत प्रतीकनं मिळवलेल्या यशाचं त्याच्या आई-वडिलांसोबत नातेवाईकांना देखील कौतुक वाटतंय.

 

ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य दिशेची गरज

कृषी उपसंचालक प्रतीक पाटील म्हणाले, सुरुवातीचे शिक्षण गावातचं झालं. बारावी झाल्यानंतर ठरवलं होतं की, स्पर्धा परीक्षा द्यायच्या. त्यामुळे बीएसस्सी अॅग्रीसाठी प्रवेश घेतला होता. आई-वडील हेच माझे प्रेरणास्थान होते. राज्यात सहाव्या क्रमांकावर आल्याने कृषी उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली. २०२२ ला ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. एका वर्षासाठी पुण्यात गेलो. पूर्व, मुख्य आणि मुलाखत पार पडली. गावातील विद्यार्थ्यांकडे पोटेन्शीएल असते. त्यांना योग्य दिशेची गरज असते. स्पर्धा खूप वाढली आहे. काही विद्यार्थ्यांना अपयश येते. अशावेळी त्यातून सावरून त्यांनी पुढील मार्ग निवडावा.

अभ्यास कर म्हणावं लागलं नाही

प्रतीकचे वडील राजाराम पाटील म्हणाले, प्रतीकला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. शेताकडे जाणे, वैरण काढणे, म्हशीचे दुध काढणे हे सर्व करून तो इथपर्यंत पोहचला. पहिल्या वर्गापासून तो पहिला राहायचा. त्याला अभ्यास कर असं कधी म्हणावं लागलं नाही. विशेष म्हणजे मला मदत करून तो इथपर्यंत पोहचला.

प्रतीकची आई म्हणाली, आनंद वाटतो. या भागात कोणी अधिकारी झाला नाही. आनंद वाटतो. यावेळी प्रतीकच्या आईचा कंठ दाटून आला. आम्ही त्याचे आईबाबा असल्याचा अभिमान वाटतो.