भूजल पातळी वाढविण्यासाठी रीचार्ज पिट, बारमाही सिंचनाची सुविधा

| Updated on: Nov 10, 2022 | 3:23 PM

80 रिचार्ज पिट विविध शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्यात आले आहेत. यामुळे पावसाळ्याचे पाणी जमिनीत मुरविता येते.

भूजल पातळी वाढविण्यासाठी रीचार्ज पिट, बारमाही सिंचनाची सुविधा
बारमाही सिंचनाची सुविधा होणार
Image Credit source: tv 9
Follow us on

वाशिम : वाशिम जिल्ह्याचा मागास ठपका पुसून टाकण्यासाठी नीती आयोगाकडून जिल्ह्यात विविध स्वरुपातील विकासात्मक कामे सुरू आहेत. खालावलेल्या पाणलोट क्षेत्राला ‘रिचार्ज पिटच्या’ माध्यमातून भूजल पातळी वाढवण्याचे नियोजन करण्यात आले. मृदा व जलसंधारण विभागाद्वारे हे नियोजन करण्यात आले. वाशिम जिल्ह्यात असे तब्बल 150 रिचार्ज पिट निर्माण करण्याचे कार्य नियोजित आहे. त्यापैकी 80 रिचार्ज पिट तयार करून झाले आहेत.

पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी थेट जमिनीत मुरविण्यासाठी रिचार्ज पिटचा पर्याय शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. यामुळं भूजल पातळी वाढून आसपासच्या विहिरी, कूपनलिका आदी नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना रिचार्ज पिट योजनेच्या माध्यमातून बारमाही पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

2020 मध्ये वाशिम जिल्ह्यात प्रयोगिक तत्वावर 10 शेतकऱ्यांच्या शेतात रिचार्ज पिट तयार करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरणे शक्य झाले. त्यामुळे गतवर्षी पुन्हा 150 रिचार्ज पिटचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले. त्यापैकी 80 रिचार्ज पिट विविध शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्यात आले आहेत. यामुळे पावसाळ्याचे पाणी जमिनीत मुरविता येते. भूजल पातळीत कमालीची वाढ होते.

वाशिम जिल्ह्यातील श्रीगिरी आणि नागठाणा या गावातील शेतकरी हनुमान सोळंके, गजानन राऊत यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना रिचार्ज पिटचा लाभ झाला.

वनराई बंधारा बांधण्यात आला. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी यासाठी मदत केली. पाणीपातळी बंधाऱ्यापलिकडं साचते. यामुळं पाणी पातळीत वाढ होईल. पिकांना याचा लाभ होईल. श्रमदानातून हे शक्य होणार आहे.

श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्यात आला. साईट पाहिल्यानंतर तीन-चार इंच पाणी होतं. आता जलसाठा वाढला आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी वाढले. शून्य बजेटमध्ये असे बंधारे बांधणे आवश्यक आहे.