कन्फ्युजन ही कन्फ्युजन है| नवा की जुना टॅक्स स्लॅब? 5 लाखापर्यंत टॅक्स आहे की नाही?

| Updated on: Feb 01, 2020 | 5:01 PM

आधीच आकड्याचं गणित सर्वसामान्य जनतेला कळत नाही. त्यात अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबबाबत (Income tax slab 2020) अर्थमंत्र्यांनी सांगितलेले आकडे डोक्याचं भजं करणारे आहेत. 

कन्फ्युजन ही कन्फ्युजन है| नवा की जुना टॅक्स स्लॅब? 5 लाखापर्यंत टॅक्स आहे की नाही?
Follow us on

Income tax slab 2020 नवी दिल्ली : कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्यूशन कुछ पता नही,  या थ्री इडियट्स सिनेमातील गाण्याच्या ओळी आजच्या अर्थसंकल्पासाठी चपखल बसत आहेत. आधीच आकड्याचं गणित सर्वसामान्य जनतेला कळत नाही. त्यात अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबबाबत (Income tax slab 2020) अर्थमंत्र्यांनी सांगितलेले आकडे डोक्याचं भजं करणारे आहेत.

कितीपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, किती उत्पन्नापासून टॅक्स भरावा लागणार, जर टॅक्स भरावा लागत असेल, तर किती टक्के भरायचा असे सगळे प्रश्न डोक्याचा भुगा करतात. त्यातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात टॅक्सस्लॅब घोषित करताना, 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असल्याचं म्हटलं. मात्र नंतर त्यांनी टॅक्सस्लॅब सांगून 2.5 ते 5 लाखाच्या उत्पन्नावर 5 टक्के कर असेल असं सांगून गोंधळात टाकलं. त्यानंतर त्यांनी पुढील टॅक्स स्लॅब सांगितले.

मात्र यावेळी निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले की, जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार  नाही. मात्र जर तुमचं उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल, तर तुमचं करपात्र उत्पन्न हे अडीच लाखापासून मोजलं जाईल. म्हणजे अडीच ते 5 लाख रुपयांसाठी 5 टक्के,  5 ते 7 लाख 50 हजारांसाठी 10 टक्के याप्रमाणे कर आकारला जाईल.

कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल

  • अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
  • उत्पन्न 2.5 ते 5 लाख – 5 टक्के कर (आधीही 5 टक्के)
  • उत्पन्न 5 लाख ते 7.5 लाख – 10 टक्के कर (आधी 20 टक्के)
  • उत्पन्न 7.5 लाख ते 10 लाख – 15 टक्के कर (आधी 20 टक्के)
  • उत्पन्न 10 लाख ते 12.5 लाख – 20 टक्के कर (आधी 30 टक्के)
  • उत्पन्न 12.5 ते 15 लाख – 25 टक्के कर (आधी 30 टक्के)
  • उत्पन्न 15 लाखांपेक्षा अधिक – 30 टक्के कर (कोणतीही सवलत नाही)

जुना की नवा टॅक्सस्लॅब?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत घोषणा केलेल्या कररचनेला जुन्या कररचनेचाही पर्याय देण्यात आला आहे. म्हणजे जुन्या किंवा नव्या टॅक्सस्लॅब या दोन्ही पद्धतीने तुम्ही रिटर्न फाईल करु शकता. मात्र मोदी सरकारने यामध्ये भुलभुलैय्या केला आहे. कारण नवे टॅक्सस्लॅब दिलासा देणारे वाटत असले, तरी या याद्वारे टॅक्स भरताना तुम्हाला कोणतीही सवलत मिळणार नाही.

नव्या कररचनेतील कर सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर मागील कररचनेनुसार मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच नव्या कररचनेचा फायदा घेतला तर विमा, गुंतवणूक, घराचं भाडं, मुलांचं शिक्षण सारख्या एकूण 70 मुद्द्यांवरील सूट मिळणार नाही. जुन्या कररचनेप्रमाणे कर भरला तर मात्र या 70 मुद्द्यांवरील सवलत घेता येईल.

नव्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचा दर 15 टक्के करण्यात आला आहे. जुन्या कंपन्यांसाठी हा कर 22 टक्के असणार आहे. कंपन्यांना देखील नवी आणि जुनी कररचना निवडण्याचा पर्याय आहे.