DHFL and Yes Bank Scam:कर्जाच्या नावाखाली बँकांकडून कोट्यवधीची रक्कम घेतली; अविनाश भोसलेविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

| Updated on: Jul 26, 2022 | 8:33 PM

येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएल समूहाचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवानसोबत डीएचएफएलला आर्थिक साहाय्य केले आहे. येस बँकेने एप्रिल ते जून 2018 या काळात डीएचएफएलमध्ये अल्पमुदतीच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरमध्ये 3983 कोटी गुंतवले होते. तसेच, येस बँकेने डीएचएफएलची समूह कंपनी असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला वांद्रे येथील प्रकल्पासाठी 750 कोटींचे आणखी कर्ज मंजूर केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

DHFL and Yes Bank Scam:कर्जाच्या नावाखाली बँकांकडून कोट्यवधीची रक्कम घेतली; अविनाश भोसलेविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल
अविनाश भोसले (संपादित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील(DHFL and Yes Bank Scam) आरोपी उद्योगपती अविनाश भोसले(Avinash Bhosle) यांच्या विरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सीबीआयकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात भोसले यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याने अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. कर्जाच्या नावाखाली बँकांकडून कोट्यवधीची रक्कम लाटल्याचा आरोप अविनाश भोसलेंवर आहे.

26 मे रोजी अविनाश भोसले यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएल समूहाचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवानसोबत डीएचएफएलला आर्थिक साहाय्य केले आहे. येस बँकेने एप्रिल ते जून 2018 या काळात डीएचएफएलमध्ये अल्पमुदतीच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरमध्ये 3983 कोटी गुंतवले होते. तसेच, येस बँकेने डीएचएफएलची समूह कंपनी असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सला वांद्रे येथील प्रकल्पासाठी 750 कोटींचे आणखी कर्ज मंजूर केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

कपिल वाधवानने डीएचएफएलच्या माध्यमातून राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना येस बँकेकडून कर्जाच्या नावाखाली 600 कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. तर भोसले यांना तीन प्रकल्पांसाठी 2018 मध्ये 68 कोटी रुपये मिळवून दिले. त्यातील अ‍ॅव्हेन्यू 54 आणि वन महालक्ष्मी हे दोन प्रकल्प बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रियांनी डेव्हलप केले आहेत.

भोसलेंना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही सल्ला शुल्क रक्कम मिळाली होती. प्रकल्पाचा खर्च वास्तुविशारद आणि अभियांत्रिकी आराखडा करार वित्तीय मूल्यांकन व संरचना आदींबाबत भोसलेंच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले कोट्याधीश असलेल्या  एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. 80 च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी कंत्राटदार म्हणून काम केले. आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग, अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.