स्टेअरींग लॉक झाल्यानं उत्तराखंडमध्ये बसचा भीषण अपघात, 26 ठार! जाणून घ्या, का होतं स्टेअरिंग लॉक?

| Updated on: Jun 06, 2022 | 10:13 AM

Uttarakhand Bus Accident : या घटनेमुळे बसचं किंवा गाडीचं स्टेअरींग नेमकं लॉक का होतं, हेही जाणून घेणं गरजेचं आहे.

स्टेअरींग लॉक झाल्यानं उत्तराखंडमध्ये बसचा भीषण अपघात, 26 ठार! जाणून घ्या, का होतं स्टेअरिंग लॉक?
भीषण अपघाताचे 26 बळी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Bus accident) भीषण अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडाही वाढलाय. रविवारी उत्तराखंडमध्ये एक बस दरीत (Road accident) कोसळली. आतापर्यंत 26 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातेय. रविवारी घडलेल्या या अपघाताच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या डामटा ते नौगांवदरम्यान, खड्ड जवळ या बसचा अपघात (Bus Accident Video) झाला. तब्बल पाचशे मीटर खोल दरीमध्ये ही बस कोसळली. एकूण 30 प्रवासी या बसमध्ये होते. त्यातील 26 जणांचा मृत्यू झाला. तर इतर प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहेत. ही बस यमुनोत्रीकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघाताचं कारणही आता समोर आलंय.

कशामुळे झाला अपघात?

उत्तरकाशीमध्ये झालेल्या बसचा अपघात स्टेअरींग लॉक झाल्यामुळे झाल्याचं समोर आलंय. भरधाव बसचं स्टेअरींग लॉक झालं. त्यामुळे चालकाला बस नियंत्रण करणं शक्य झालं नाही. अखेर प्रवशांनी भरलेली ही बस थेट दरीत कोसळली.

रात्री उशिरापर्यंत सुरु होतं बचावकार्य

या अपघातानंतर तातडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याही बातचीत केली होती. स्थानिक यंत्रणा आणि एसडीआरएफच्या टीमने तत्काळ बचावकार्य करत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मृतांच्या नातेवाईकांना मदत : मुख्यमंत्र्यांची घोषणा

दरम्यान, आता या घटनेमुळे बसचं किंवा गाडीचं स्टेअरींग नेमकं लॉक का होतं, हेही जाणून घेणं गरजेचं आहे. याआधीही अनेकदा गाडीचं स्टेअरींग लॉक झाल्यामुळे अनेक अपघात घडलेले आहेत. गाडीचं स्टेअरीग लॉक नेमकं का होतं, यामागची तीन महत्त्वाची कारणं जाणून घेऊयात.

का होतं स्टेअरींग लॉक?

  1. हायड्रोलिक फेल्युअर : स्टेअरींग लॉक होण्याच्या प्रमुख कारणांपैकी हे एक कारण आहे. हायड्रॉलिक फेल्युअर झाल्यानं कोणत्याही गाडीचं स्टेअरींग लॉक होऊ शकतं. हायड्रॉलिक फेल्युअरचा अर्थ काय, हे देखील समजून घेऊ. गाडीच्या पुढील भागाची चाकं फिरली जावीत, यासाठी एक रॉड काम करतो. या रॉडच्या मदतीने स्टेअरींग जोडलेलं होतं. स्टेअरींग रॅक आणि रॉड यांचं कार्य सुरळीत व्हावं म्हणून आईलही सतत काम करत असतं. जर यात ऑईल लिक झालं, तर रॅक फिरणं थांबतं आणि त्याचा परिणाम स्टेअरिंगवर होतो. आईल लिकमुळे आधी स्टेअरिंग हार्ड होतं आणि त्यानंतर ते लॉकही होण्याची शक्यता असते.
  2. फुल टर्न आणि ब्रेक : गाडीचा फुल टर्न मारुन ब्रेक मारल्यानंही गाडीचं स्टेअरींग लॉक होण्याची भीती असते. गाडीचा वेग, गाडीचं मोशन याचं संतुलन जर चुकलं तरिही गाडीचं स्टेअरींग लॉक होण्याची भीती असते. अनेकदा ड्रायव्हर वेगावरील संतुलन बिघडल्यानंतर जोराने स्टेअरींग वाकडं तिकडं फिरवतो. यामुळेही स्टेअरींग लॉक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  3. गाडी नियमित सर्विस न करणं : गाडी नियमित सर्विसिंग न करणं, तिची निगा न राखणं, ऑईल वेळच्या वेळी न बदलणं, ही कारणंही स्टेअरींग लॉकसाठी कारणीभूत ठरू शकतात. सस्पेशन, स्टेअरींग रॅक आणि रॉड यांचाही एकमेकांशी जवळचा संबंध असतो. यापैकी एकाही बाबीत बिघाड झाला, तर त्याचा थेट परिणाम स्टेअरींग लॉक सारख्या गोष्टीवर होऊ शकतं, असं जाणकार सांगतात.

उत्तरखंडमधील भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदतही जाहीर करण्यात आलीय.