मरुन जाऊ, पण मुलावर सरकारी खर्चानं उपचार करणार नाही, असं म्हणणारे बिहारचे मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर जननायक का ठरले?

| Updated on: Feb 17, 2022 | 6:30 AM

1952 पासून आमदार राहिलेला व्यक्ती, दोन वेळा मुख्यमंत्री असलेले कर्पुरी ठाकूर बिहारच्या जनतेची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत स्वत:साठी घर बांधत नाहीत, असा राजकीय नेता आता पाहायला मिळणं दुर्मिळ झालंय.

मरुन जाऊ, पण मुलावर सरकारी खर्चानं उपचार करणार नाही, असं म्हणणारे बिहारचे मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर जननायक का ठरले?
कर्पुरी ठाकूर
Follow us on

मुंबई: जननायक कर्पुरी ठाकूर (Karpoori Thakur) यांची ओळख स्वातंत्र्यसेनानी (Freedom Fighter) शिक्षक, राजकीय नेता अशी राहिली. पण, त्यांना जनता जननायक या नावानं ओळखत होती. बिहारचे (Bihar) दुसरे उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या कर्पुरी ठाकूर यांनी राजकीय जीवनात तत्व सोडली नाहीत. त्यामुळंचं ते खऱ्या अर्थानं जननायक ठरले. कर्पुरी ठाकूर यांचा जन्म बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यीतल पिंतौझिया म्हणजेच आताच्या कर्पुरीग्राममध्ये 24 जानेवारी 1924 रोजी झाला. कर्पुरी ठाकूर यांनी भारत छोडो आंदोलनात उडी घेतली. त्यामध्ये त्यांना 26 महिने तुरुंगात राहावं लागलं. 22 डिसेंबर 1970 ते 2 जून 1971 आणि 24 जून 1977 ते 21 एप्रिल 1979 मध्ये त्यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कर्पुरी ठाकूर यांच्या जीवनातील काही प्रसंग डोळ्यासमोर आले तरी अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. कारण त्यांच्या सारखा सामान्य जनतेचा विचार करणारा नेता राजकारणात पाहायला मिळत नाही.

इंदिरा गांधींचा प्रस्ताव नाकारला

जयंत जिज्ञासू यांनी कर्पुरी ठाकूर यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला आहे. 1974 मध्ये कर्पुरी ठाकूर यांच्या मुलाची निवड मेडिकलसाठी झाली होती. मात्र, तो आजारी पडला होता. त्याला दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया होणार होती. इंदिरा गांधींना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी एका राज्यसभा खासदाराला पाठवून ठाकूर यांच्या मुलाला एम्स रुग्णालयात दाखल केलं. इंदिरा गांधी स्वत: भेटायला गेल्या त्यांनी सरकारी खर्चानं अमेरिकेत उपचारासाठी पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला. ही गोष्ट कर्पुरी ठाकूर यांना समजली तेव्हा त्यांनी “मरुन जाऊ, पण मुलावर सरकारी खर्चानं उपचार करणार नाही” असं सांगितलं. त्यानंतर काही काळानंतर जयप्रकाश नारायण यांनी व्यवस्था करुन न्यूझीलंडला उपचारासाठी पाठवलं.

मित्राचा फाटका कोट घालून परराष्ट्र दौऱ्यावर

‘द किंगमेकर:लालू प्रसाद की अनकही दास्तां’ पुस्तकाचे लेख जयंत जिज्ञासू यांनी त्यांच्या एका लेखात कर्पुरी ठाकूर यांच्या साधेपणाचा एक किस्सा सांगितला आहे. कर्पुरी ठाकूर 1952 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यावेळी त्यांची ऑस्ट्रियाला जाणाऱ्या शिष्टमंडळात निवड झाली होती. कर्पुरी ठाकूर यांच्याकडे घालण्यासाठी ड्रेस नव्हता. त्यांनी त्यांच्या एका मित्राला कोट मागितला. मित्रानं दिलेला कोट थोडासा फाटलेला होता. तो कोट घालून कर्पुरी ठाकूर दौऱ्यावर गेले. युगोस्लावियाचे प्रमुख मार्शल टीटी यांनी कर्पुरी ठाकूर यांचा कोट पाहून त्यांना नवीन कोट दिला.

चंद्रशेखर यांनी जमवलेला निधी मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये

सुरेंद्र किशोर यांनी कर्पुरी ठाकूर आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याबद्दल एक प्रसंग लिहून ठेवला आहे. पाटण्यामध्ये जयप्रकाश नारायण यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सुरु होता. चंद्रशेखर आणि नानाजी देशमुख यांच्यासह देशातील मोठे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर फाटलेला सदरा आणि तुटलेल्या चप्पलेसह आले. हे पाहून एका नेत्यानं, मुख्यमंत्र्यांच्या चांगल्या राहणीमानासाठी किती पगार द्यावा, असं वक्तव्य केलं. त्यानंतर चंद्रशेखर त्यांच्या जागेवरुन उठले. चंद्रशेखर यांनी त्यांचा सदरा पुढं करुन कर्पुरी ठाकूर यांच्या सदऱ्यासाठी निधी जमवला. मात्र, ज्यावेळी चंद्रशेखर हा निधी कर्पुरी ठाकूर यांना देऊ केला. त्यावेळी कर्पुरी ठाकूर यांनी ती रक्कम मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये जमा केली.

कर्पुरी ठाकुरांच्या घरी पंतप्रधान जेव्हा पोहोचतात

कर्पुरी ठाकूर बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले. मात्र, स्वत:साठी चांगलं घर बांधू शकले नाहीत. पंतप्रधान चौधरी चरण सिंह त्यांच्या घरी गेले होते. ठाकूर यांच्या दरवाजा छोटा असल्यानं चौधरी चरण सिंह यांच्या डोक्याला दुखापत होते. चौधरी चरण सिंह म्हणाले कर्पुरी,जी इसको ऊंचा करवाओ. तेव्हा कर्पुरी ठाकूर यांनी उत्तर दिलं की ” “जब तक बिहार के गरीबों का घर नहीं बन जाता, मेरा घर बन जाने से क्या होगा?” म्हणजेच जोपर्यंत बिहारच्या गरिबांची घर बांधली जात नाहीत तोपर्यंत माझं घर बांधून काय उपयोग?.

बिहारमध्ये 70 च्या दशकात पाटण्यात आमदार आणि माजी आमदारांसाठी सरकार स्वस्त दरात जमीन उपलब्ध करुन देत होते. मात्र, आमदारांनी सांगुनही कर्पुरी ठाकूर यांनी जमीन घेण्यास नकार दिला. एक आमदार कर्पुरी ठाकूर यांना जमीन घ्या तुमच्या मुलांच्या उपयोगात येईल, असं म्हटलं. मात्र, त्यांनी मुलं गावाकडं राहतील असं सांगितलं होते. कर्पुरी ठाकूर यांचं निधन 17 फेब्रुवारी 1988 रोजी आकस्मिक निधन झालं. त्यानंतर हेमवंती नंदन बहुगुणा कर्पुरी ठाकूर यांच्या झोपडीसारख्या घराकडे पाहून रडू लागले होते. 1952 पासून आमदार राहिलेला व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक असणारा व्यक्ती, दोन वेळा मुख्यमंत्री स्वत:साठी घर बांधत नाही हे पाहून बहुगुणा भावूक झाले.

इतर बातम्या:

केळीला निवडला हळदीचा पर्याय, पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांच्या पदरी काय? वाचा सविस्तर

Nagpur | आता महिला उद्योजकांसाठी स्टार्ट अप, आर्थिक सक्षमीकरणाचा उपक्रम काय आहे, जाणून घ्या