Saraswati Das: मॉडेल सरस्वती दासचा संशयास्पद मृत्यू; कोलकातामध्ये गेल्या 15 दिवसांत मृत्यूची चौथी घटना

| Updated on: May 30, 2022 | 4:43 PM

याआधी कलाविश्वातील मंजुषा नेओगी, बिदिशा डे मजुमदार, पल्लवी डे यांचाही संशयास्पद मृत्यू झाला. सरस्वतीचं या तिघींशी काही कनेक्शन आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.

Saraswati Das: मॉडेल सरस्वती दासचा संशयास्पद मृत्यू; कोलकातामध्ये गेल्या 15 दिवसांत मृत्यूची चौथी घटना
Saraswati Das
Image Credit source: Instagram
Follow us on

कोलकात्यामध्ये (Kolkata) आणखी एक मॉडेल तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. गेल्या पंधरा दिवसांतील ही चौथी घटना आहे. मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल सरस्वती दासचा (Saraswati Das) मृतदेह रविवारी कसबा परिसरातील बेडियाडंगा (Bediadanga) इथल्या तिच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ती 18 वर्षांची होती. सरस्वतीने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. “हे आत्महत्येचं प्रकरण दिसून येत आहे, परंतु आम्ही इतर अँगलनेही तपास करत आहोत. सरस्वतीच्या आजीने तिला सर्वांत प्रथम पाहिलं होतं. त्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेलं आणि त्यानंतर आम्हाला माहिती दिली. आम्ही तिच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत,” असं ते म्हणाले.

याआधी कलाविश्वातील मंजुषा नेओगी, बिदिशा डे मजुमदार, पल्लवी डे यांचाही संशयास्पद मृत्यू झाला. सरस्वतीचं या तिघींशी काही कनेक्शन आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. “शनिवारी रात्री तिची आई आणि काकी कामावर गेल्यानंतर सरस्वतीने आत्महत्या केल्याचं समजतंय. आम्ही तिचा मोबाईल फोन जप्त केला. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर ती कितपत सक्रिय होती, याचाही तपास करत आहोत”, असं पोलीस अधिकारी पुढे म्हणाले. सरस्वतीच्या वडिलांनी तिच्या बालपणातच कुटुंब सोडलं होतं. तिचं संगोपन आई आणि काकीने केलं होतं.

याआधी 26 वर्षीय मंजुषा तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली. मंजुषाच्या आधी बिदिशाचाही मृत्यू झाला. बिदिशा आणि मंजुषा एकमेकांच्या मैत्रिणी होत्या. बिदिशाच्या संशयास्पद मृत्यूने ती अस्वस्थ होती, असं मंजुषाच्या आईने सांगितलं. तर 15 मे रोजी गारफा इथं भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये पल्लवी डे मृतावस्थेत आढळून आली होती.

हे सुद्धा वाचा