Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपाल अडकणार? एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स!

| Updated on: Nov 09, 2020 | 5:15 PM

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन (Drugs Case) प्रकरणी एनसीबीचे पथक आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या (Arjun Rampal) घरापर्यंत पोहोचले आहे.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपाल अडकणार? एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन (Drugs Case) प्रकरणी एनसीबीचे पथक आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या (Arjun Rampal) घरापर्यंत पोहोचले आहे. एनसीबीच्या धाडीनंतर आता अर्जुन रामपालला 11 नोव्हेंबरपूर्वी चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. तसे समन्स एनसीबीकडून बजावण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Bollywood Actor Arjun Rampal Summoned By NCB in Drugs Case).

सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. तसेच, अर्जुनच्या वाहन चालकाला ताब्यात घेतल्याचे कळते आहे.

ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मेहुण्याचे नाव

या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे (Bollywood Actor Arjun Rampal Summoned By NCB in Drugs Case).

बॉलिवूडमध्ये ड्रग्जची पाळेमुळे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. शनिवारी रात्रीपासूनच या कारवाईला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.

निर्मात्याच्या घरात ड्रग्जचा साठा

रविवारी (8 नोव्हेंबर) सकाळी फिरोज यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. यावेळी एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले. यानंतर नाडियाडवाला यांच्या पत्नीच्या अटकेची माहिती समोर आली. NCB च्या या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडले होते. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून घरातून अटक केली. तसेच, फिरोज यांनादेखील समन्स बजावण्यात आले आहेत.

एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरणेमध्ये अनेक ड्रग्स पेडलर्सच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीत 5 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली होती. यातीलच एका ड्रग्ज तस्कराने चौकशीदरम्यान एनसीबीला फिरोज नाडियाडवाला यांचे नाव सांगितले होते.

(Bollywood Actor Arjun Rampal Summoned By NCB in Drugs Case)