अंगावर शहारे आणणारा ‘उरी’

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

“फर्ज़ और फर्ज़ी में बस एक मात्रा का फर्क होता है… ये हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है… ये घर में घुसेगा भी और मारेगा भी…” थिएटरमध्ये हे संवाद ऐकल्यावर तुम्हीही उत्साही व्हाल. देशभक्ती, उत्कंठा आणि अंगावर शहारे आणणारे दृश्य असलेला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. 18 सप्टेंबर 2016 […]

अंगावर शहारे आणणारा उरी
Follow us on

“फर्ज़ और फर्ज़ी में बस एक मात्रा का फर्क होता है… ये हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है… ये घर में घुसेगा भी और मारेगा भी…” थिएटरमध्ये हे संवाद ऐकल्यावर तुम्हीही उत्साही व्हाल. देशभक्ती, उत्कंठा आणि अंगावर शहारे आणणारे दृश्य असलेला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-कश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. त्याच्या प्रत्युरादाखल जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याचीच ही उत्कंठावर्धक कथा.

आतापर्यंत भारतीय जवानांच्या शौर्यगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे उरीही त्याच पठडीतील असेल, असं वाटत होतं. पण हा समज उरीचा दिग्दर्शक आदित्य धारनं पूर्णपणे चुकीचा ठरवलाय. त्याने चित्रपटाला दिलेली ट्रीटमेन्ट वाखाणण्याजोगी आहे. पहिल्या फ्रेमपासून ‘उरी’ पकड घ्यायला सुरुवात करतो.

संजू, मनमर्झिया, राझी, मसान, रमन राघवसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा विकी कौशलनं पुन्हा एकदा आपण लंबी रेस का घोडा असल्याचं दाखवून दिलंय. मेजर विहान शेरगिलच्या भूमिकेला विकीनं पूर्ण न्याय दिलायं. त्याचं वावरणं; त्याचं असणं; बॉडी लँग्वेज सगळ्याच गोष्टीवर विकीनं पूर्ण मेहनत घेतलेली दिसते आहे. उरीवर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी पेटलेला असतो. त्याल्या आपला मित्राच्या मृत्यूचा बदला घ्यायचा असतो. आपल्या 19 जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो. सोलो हिरो म्हणून विकीचा हा पहिलाच चित्रपट आणि त्यानं यामध्ये पूर्णपणे आपली छाप सोडलीय. याचं श्रेय जसं विकीला जातं तसंच चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरलाही जातं. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली नायकाच्या तोंडी धासू संवाद; जबरदस्त एक्शन सीन्स तो देऊ शकला असता. पण या सगळ्या गोष्टींना केराची टोपली दाखवत घटनेचं गांभिर्य ओळखून ती घटना तितक्याच गंभीरतेने मोठ्या पडद्यावर दाखवली आहे.

चित्रपटाचा पूर्वाध जरी विस्कळीत आणि संथ वाटत असला तरी तरी उत्तरार्धानं मात्र चांगली पकड घेतलीय. सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे कलाकारांचा अभिनय. विकी कौशल सोबतच परेश रावल, योगेश सोमण, मोहित रैना, यामी गौतम, किर्ती कुल्हेरी यांनी आपल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. किर्ती फक्त काही प्रसंगात दिसलीय. तिच्या वाट्याला संवादही कमी आहेत. तरीही ती लक्षात राहते. चित्रपटात बॉम्ब हल्ले, गोळीबार हा अगदी आपल्या समोरच चालला असल्याचा भास आपल्याला होत राहतो. चित्रपटाचं संगीतही ठीकठाक आहे. चित्रपटात दोन गाणी आहेत. परंतु एकही गाण लक्षात राहण्यासारखं नाही. गाणी नसती तरी काही फरक पडला नसता.

चित्रपटात काही त्रुटी आहेत. पण आपल्या भारतीय सैन्याचं शौर्य मोठ्या पडद्यावर बघताना सगळं माफ. उत्तरार्धात खऱ्या सर्जिकल स्ट्राइकला सुरुवात होते. मेजर विहान  सर्जिकल स्ट्राइकची व्युहरचना कशी आखतो. यासाठी त्याला गुप्तचर यंत्रणा, सरकार कशी मदत करतं, हे सगळं मोठ्या पडद्यावर बघत असताना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढते. आपल्या जवानांची ही कथा शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलीय. काही त्रुटी सोडल्या तर ही शौर्य गाथा एकदा मोठ्या पडद्यावर बघायलाच हवी.

‘उरी’ सिनेमाला ‘टीव्ही 9 मराठी’कडून 3 स्टार…