रिव्ह्यू : वेब सीरिज – द फॅमिली मॅन

| Updated on: Sep 23, 2019 | 4:06 PM

मनोज बाजपेयीचा द फॅमिली मॅन, अगदी सर्वसामान्य मुंबईकरांसारखा गर्दीला, ट्रॅफिकला, बायकोच्या प्रश्नांना वैतागलेला खऱ्या अर्थानं फॅमिली मॅन, मात्र, कामात स्वतःला झोकून देताना स्वतःचा आणि कुटुंबियांचा विचार न करता रिस्क घेणारा गुप्तहेर मनोजनं झकास रंगवलाय.

रिव्ह्यू : वेब सीरिज - द फॅमिली मॅन
Follow us on

द फॅमिली मॅन (The Family Man) हे काही कुठल्या स्पाय थ्रिलर जेम्स बाँड टाईप वेब सीरिजचं नाव असेल असं कुणाला खरं वाटणार नाही. (हॉलिवूडप्रेमींना याच नावाचा एक निकोलस केजचा सिनेमा कदाचित आठवत असावाही.) मात्र, द फॅमिली मॅन (The Family Man) हा स्पाय थ्रिलर असला तरीही जेम्स बाँडपटासारखा सुपर गॅजेट वापरणारा तो गुप्तहेर नाही.

मनोज बाजपेयीचा द फॅमिली मॅन, अगदी सर्वसामान्य मुंबईकरांसारखा गर्दीला, ट्रॅफिकला, बायकोच्या प्रश्नांना वैतागलेला खऱ्या अर्थानं फॅमिली मॅन, मात्र, कामात स्वतःला झोकून देताना स्वतःचा आणि कुटुंबियांचा विचार न करता रिस्क घेणारा गुप्तहेर मनोजनं झकास रंगवलाय.

स्वतःच्या चुकीसाठी टीमला जबाबदार न ठरवता स्वतः प्रायश्चित्त घेणारा. टीम मेंबरच्या मृत्यूनं हळहळणारा आणि स्वतःच्या मुलांचं ‘ब्लॅकमेलिंग’ एन्जॉय करणारा श्रीकांत तिवारी हा कठोर, हळवा आणि त्याचवेळी सामान्य मुंबईकरांसारखा गृह कर्ज आणि इतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी धावपळ करणारा हा खराखुरा फॅमिली मॅन आहे.

तसं पहायला गेलं तर द फॅमिली मॅन हा कुठे कुठे अनरॉल्ड श्वार्त्सनेगरच्या ‘ट्रू लाईज’ची कॉपी वाटायला लागतो, पण, अरनॉल्ड हा फिल्ड एजंट, मसलमॅन एक्शन हीरो तर. मनोज हा फिल्ड एजंट कम डेस्कवर अऍनॅलिसीस करणारा.

द फॅमिली मॅनची कथा ही अगदी सरधोपट असली तरी सगळे दहा चे दहा एपिसोड्स प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरतात. कथा आपली नेहमीचीच, दहशतवादी हल्ल्याची प्लॅनिंग नेमका कसा आणि कुठे हल्ला त्याबाबतचं सस्पेंस आणि मग तो रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचे वेगवेगळे फंडे वगैरे वगैरे.. पण, या सगळ्यात कथा कुठे कुठे रेंगाळलीय, पण, काश्मीर, दहशतवाद आणि गुप्तहेरांच्या कथा सध्याचा हॉट टॉपिक आहे त्यामुळे सध्यातरी बऱ्यापैकी द फॅमिली मॅन ट्रेंड करतोय.

द फॅमिली मॅनची कथा मुंबईत सुरू होऊन काश्मीर, पाकव्याप्त बलुचिस्तान अशी फिरत परत मुंबईत येऊन धडकते. द फॅमिली मॅनच्या कथेत अनेक धक्कातंत्रांचा वापर करण्यात आला असला तरी एका विशिष्ट मर्यादेपलिकडे त्यांचा प्रभाव जाणवत नाही.

राज अँड डीकेवर मनोजचा विश्वास

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीरज पांडेसारख्या दिग्गज डिरेक्टरसोबत अय्यारीसारखा सुपरफ्लॉप हेरपट देऊनही मनोज बाजपेयीनं राज अँड डिकेसारख्या डिरेक्टर्सवर विश्वास ठेवून श्रीकांत तिवारी साकारलाय.

राज अँड डीके या दुकलीनं अनेक सिनेमे डिरेक्ट केलेत पण माझ्या आवडीचा सिनेमा म्हणजे 99, 2009 साली आलेला 99 हा खऱ्या अर्थानं कॉमेडी-थ्रिलर होता. राज अँड डीकेचा याआधीचा सिनेमाही हेरपट होता, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिसचा ‘द जंटलमन’! मात्र हा हेरपट दणकून आपटला होता तरीही या दोघांनी पुन्हा स्पाय जॉनरला हात घातला.

पूर्ण सीरीज ही मनोज बाजपेयीनं स्वतःच्या खांद्यावर तोलून धरलीय. पण, मुळात कथेतच फारसा दम नसल्यानं त्याचे प्रयत्न काही ठिकाणी तोकडे पडताना दिसतात. मनोजच्या पत्नीच्या भूमिकेत दिसते दक्षिण भारतातली अभिनेत्री प्रियामणी, बाकी इतर कलाकारांमध्ये शरद केळकर, दर्शन कुमार हे ठीकठाक.

एकूणच अॅमेझॉन प्राईम व्हिडिओनं नेटप्लिक्सच्या नेमकं एक आठवडा आधी त्याच जॉनरची वेबसीरीज ‘स्ट्रिम’ करून आघाडी घेण्याचा प्रयत्न केलाय, 27 सप्टेंबरला नेटफ्लिक्सची बार्ड ऑफ ब्लड स्ट्रिम होतेय. शाहरुख खानची निर्मिती असलेल्या बार्ड ऑफ ब्लडमध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत असेल तर त्याच्या सोबत अॅमेझॉनच्या ‘मेड इन हेवन’ या वेबसीरीजमध्ये दिसलेली शोबिता धुलीपाल दिसेल तसंच किर्ती कुल्हारीही असणाराय. बार्ड ऑफ ब्लडचं डिरेक्शन अमिताभला घेऊन ‘तीन’ आणि ‘युद्ध’ ही वेबसीरीज डिरेक्ट करणाऱ्या रिभू दासगुप्ताच्या खांद्यावर आहे. आता द फॅमिली मॅन कि बार्ड ऑफ ब्लड दोघांपैकी कोणती सीरीज प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरते ते दीड दोन आठवड्यानंतरच कळेल.

ता. क. बॉलिवूडमध्ये हेरपट चालत नाहीत, असं मिथक आहे, अगदी सुरुवातीच्या काळापासून कुणी हेरपटांच्या वाट्याला गेलं नाही. नाही म्हणायला जितेंद्रचा फर्ज, धर्मेंद्रचा आंखे हे काही चित्रपट चालले मात्र, सनी देओलचा हिंमत, अक्षय कुमारचा मि. बाँड हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाणकन आपटले.