संकटात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा चीनपुढे पसरवले हात, पाहा आता काय मागितले

| Updated on: Mar 28, 2024 | 5:55 PM

मालदीवला पुन्हा एकदा चीनपुढे हात पसरावे लागले आहे. मालदीवच्या प्रमुखांनी पुन्हा एकदा चीनकडे मदत मागितली आहे. मालदीव संकटात असताना भारत लगेचच त्याला मदत करत होता. पण आता चीन समर्थक प्रमुख सत्तेत आल्याने त्यांचा चीनकडे कल अधिक आहे.

संकटात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा चीनपुढे पसरवले हात, पाहा आता काय मागितले
Follow us on

India-Maldive row : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पुन्हा एकदा चीनपुढे गुडघे टेकले आहेत. त्यांनी चीनकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर चीनने मालदीवमध्ये 1500 टन पिण्याचे पाणी पाठवले आहे. मालदीव सरकारने मंगळवारी सांगितले की, तिबेटमधील हिमनद्यांमधून गोळा केलेले पाणी तीव्र पाणीटंचाई दरम्यान मालेपर्यंत पोहोचले आहे. चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाचे अध्यक्ष यान जिन्हाई यांच्या मालदीवच्या भेटीदरम्यान मालदीवला पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

गेल्या वर्षी झाली होती भेट

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोहम्मद मुइज्जू आणि यान जिन्हाई यांच्यात भेट झाली होती. त्यादरम्यान हिमनदीतून जमा झालेले पाणी त्यांना द्यावे, असे सांगण्यात आले. हे पाणी स्वच्छ आणि खनिजांनी समृद्ध आहे. मोहम्मद मुइझ्झू यांनी अध्यक्ष झाल्यानंतर पहिली भेट चीनला दिली होती. आजपर्यंत मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आधी भारताला भेट देत होते.

मागचं सरकार हे भारताच्या बाजुने होते. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले होते. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध होते. पण मुइज्जू हे सरकार मध्ये आल्यापासून आणि ते ते चीन समर्थक असल्याने भारत-मालदीव संबंध बिघडले आहेत. मालदीवला याआधी भारताने पुढे येऊन अनेकदा मदत केली होती. डिसेंबर 2014 मध्ये जेव्हा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली तेव्हा भारताने तात्काळ विमानाद्वारे मालदीवमध्ये पाणी पोहोचवले होते.

मालदीवला तीन वेळा मदत

चीनकडून आतापर्यंत मालदीवला तीन वेळा मदत करण्यात आली आहे. चीन मालदीवला आधुनिक लष्करी उपकरणे आणि लष्करी मदत देखील देत आहे. चीन आणि मालदीवमध्ये दोन लष्करी करार झाले होते. मालदीववर चीनचं मोठं कर्ज आहे. त्यामुळे मालदीवला चीनपुढे झुकावे लागत आहे. चीन कर्ज देऊन छोट्या देशांना आपला गुलाम करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर भारतीय लोकांना त्यांनी या बेटला भेट देण्याचे आवाहन केले होते. पण यावर मालदीवमधील तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर भारताने याबाबत कडक भूमिका घेतली होती. मालदीवने तिन्ही मंत्र्यांना बडतर्फ केले होते. पण यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले.

भारतासाठी का महत्त्वाचा आहे मालदीव

मालदीवचे हिंद महासागरातील स्थान महत्त्वाचे आहे. हिंद महासागरातून व्यापार करण्यासाठी देखील मालदीव हा एका दरवाज्याप्रमाणे आहे. मालदीवमधून भारताला हिंद महासागरातील हालचालींवर नजर ठेवता येत होती. त्यामुळे भारत मालदीवला जास्त महत्त्व देत होता.

आता भारताने मालदीवचा पर्याय शोधून त्यावर काम करायला सुरुवात केली आहे. भारताने मालदीवला विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारत लक्षद्वीप बेटांवरुन हिंद महासागरात लक्ष ठेवणार आहे.