निर्भयाच्या मारेकऱ्यांना 7 दिवसांची मुदत, सर्वांना एकत्रच फाशी!

| Updated on: Feb 05, 2020 | 4:08 PM

निर्भया खटल्यातील चारही दोषींना फाशी झाली आहे. मात्र ही फाशी कायद्यातील तरतुदींमुळे दोन वेळा टळली आहे. कायद्यातील पळवाटा शोधून, दोषी आरोपी फाशी लांबवण्याचे प्रयत्न करत आहेत.

निर्भयाच्या मारेकऱ्यांना 7 दिवसांची मुदत, सर्वांना एकत्रच फाशी!
Follow us on

नवी दिल्ली : निर्भयाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फासावर लटकवण्याची केंद्र आणि दिल्ली पोलिसांची याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi gang-rape case) फेटाळली. सर्व दोषींना एकत्रच फाशी होईल, असे निर्देश कोर्टाने  दिले. याशिवाय कोर्टाने सर्व दोषींना 7 दिवसांच्या आत सर्व कायदेशीर मार्ग अवलंबण्याची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे या सात दिवसांच्या आत दोषींना पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्याची मुदत आहे. (Delhi gang-rape case)

निर्भया खटल्यातील चारही दोषींना फाशी झाली आहे. मात्र ही फाशी कायद्यातील तरतुदींमुळे दोन वेळा टळली आहे. कायद्यातील पळवाटा शोधून, दोषी आरोपी फाशी लांबवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र आता हायकोर्टाने त्यांना केवळ 7 दिवसांचीच मुदत दिली आहे.

कोर्टाने लांबलेल्या फाशीवरुन प्रशासनालाही धारेवर धरलं. तसंच आठवडाभरात नवं डेथ वॉरंट लागू करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले.

सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना एकत्रच दोषी ठरवलं.  दोषींचा गुन्हा क्रूरतेचा कळस होता, शिवाय त्याचा समाजावर मोठा आघात झाला. मात्र संविधानाच्या कलम 21 नुसार काही कायदेशीर मार्ग आहेत, ज्याचा उपयोग करुन आरोपींनी फायदा उचलला. दोषींना खूपच वेळ मिळाला. 2017 मध्येच याचिका फेटाळल्यानंतरही डेथ वॉरंट जारी झालं नाही. त्याबाबत कुणीच हरकतही घेतली नाही, असं कोर्टाने परखड शब्दात सुनावलं.

दोनवेळा फाशी टळली

अक्षय ठाकूर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) आणि विनय शर्मा (26) या चार  दोषी आरोपींची फाशी दोनवेळा टळली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणाच्या 7 जानेवारीला झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने चार आरोपींविरोधात डेट वॉरंट जारी केल होतं. त्यानुसार या चौघांना 22 जानेवारीला फासावर लटकवलं जाणार होतं. दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

त्यानुसार 17 जानेवारीच्या सुनावणीदरम्यान चारही आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं. या डेथ वॉरंटनुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल, असा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला होता. मात्र दोषी आरोपी विनय शर्माने फाशीला स्थगितीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस कोर्टात केल्याने 1 फेब्रुवारीची फाशी टळली होती.

निर्भया बलात्कार प्रकरण

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली (nirbhaya rape case) होती.

संबंधित बातम्या 

निर्भया बलात्कार प्रकरण : तारीख टळली; पण फाशी नाही  

निर्भया बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती, पटियाला कोर्टाचा निर्णय