आधी खंडणीसाठी मित्राची हत्या, नंतर मृतदेह शोधण्यासाठी मदतीचा बनाव

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

पुणे : पुण्यात खंडणीसाठी मित्राची अपहरण करुन निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. निखील आंग्रोळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. निखील दहावीच्या वर्गात शिकत होता. या प्रकरणी बिनयसिंग राजपूत आणि ऋषिकेश पोळ या दोन आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, निखीलला ज्यांनी मारलं, त्या मित्रांनीच निखीलच्या कुटुंबीयांना त्याचा मृतदेह शोधण्यासाठी मदत केली. संकटात मदतीला येते त्याला मित्र […]

आधी खंडणीसाठी मित्राची हत्या, नंतर मृतदेह शोधण्यासाठी मदतीचा बनाव
Follow us on

पुणे : पुण्यात खंडणीसाठी मित्राची अपहरण करुन निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. निखील आंग्रोळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. निखील दहावीच्या वर्गात शिकत होता. या प्रकरणी बिनयसिंग राजपूत आणि ऋषिकेश पोळ या दोन आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, निखीलला ज्यांनी मारलं, त्या मित्रांनीच निखीलच्या कुटुंबीयांना त्याचा मृतदेह शोधण्यासाठी मदत केली.

संकटात मदतीला येते त्याला मित्र म्हणतात असे आपण नेहमी ऐकत आलो आहे. मात्र पुण्यात मित्रांनीच आपल्या मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. रविवारी बिनय सिंग याने आपल्या मित्रांच्या मदतीने निखीलची हत्या केली. मित्रांनी रविवारी दुचाकीवरुन निखीलचं अपहरण केलं होतं. यावेळी त्यांनी खंडणीसाठी निखील आंग्रोळकरची हत्या केली. गळा दाबून आणि डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून निखीलचं आयुष्य संपवलं आणि हत्येनंतर निखीलचा मृतदेह निर्जनस्थळी जंगलात पुरला.

निखीलचा संपर्क होत नसल्यानं पालकांनी अनेक ठिकाणी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. निखिलचा मृतदेह शोधण्यासाठी परिसर पिंजून काढला. निखीलच्या मित्रांना फोन करुन माहिती घेतली. मात्र काही थांगपत्ता लागेना. त्यानंतर निखीलच्या मित्रांनीच मृतदेह शोधण्यासाठी कुटुंबीयांना मदत केली.

चार दिवसांपासून निखीलचा तपास लागत नसल्यानं पोलीसही हैराण झाले होते. पोलिसांनी मित्रांकडेही चौकशी केली. मात्र, तिथंही काही हाती लागेना. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच मारेकरी पोपटासारखे बोलू लागले. पैशासाठी हत्या केल्याचं सांगत गुरुवारी मृतदेह दाखवला. या प्रकरणी पोलिसांनी  बिनयसिंग राजपूत आणि ऋषिकेश पोळच्या मुसक्या आवळल्या आहेत.

निखील,  बिनयसिंग आणि ऋषिकेश हे तिघेही मित्र होते. बिनयसिंग हा निखीलच्या शेजारीच राहत होता. निखिलच्या वडिलांचा फ्रॅबीकेशनचा व्यवसाय होता. तिघांचं घरी येणंजाणं होतं, मात्र पैशांच्या हव्यासापोटी मित्रच मित्राच्या जीवावर उठले.