साखरपुड्याहून परतताना भीषण अपघातात मृत्यू, सात जणांना एकाच चितेवर अग्नी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

यवतमाळ : ट्रक आणि क्रूझरच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. चापर्डा येथे सोमवारी रात्री झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. या सर्व मृतांवर त्यांच्या पार्डी या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील सात जणांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. पार्डी गावच्या नितीन थूल नामक तरुणाचा […]

साखरपुड्याहून परतताना भीषण अपघातात मृत्यू, सात जणांना एकाच चितेवर अग्नी
Follow us on

यवतमाळ : ट्रक आणि क्रूझरच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. चापर्डा येथे सोमवारी रात्री झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. या सर्व मृतांवर त्यांच्या पार्डी या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील सात जणांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला.

पार्डी गावच्या नितीन थूल नामक तरुणाचा यवतमाळ येथील एका युवतीशी साखरपुडा होता. तो कार्यक्रम आटोपून परतताना यवतमाळ-कळंब मार्गावरील घोटी गावापुढे ट्रक आणि क्रूझर गाडीचा अपघात घडला. सक्षम थूल (4), सानिया बोनदाडे (5), अर्पिता थूल (32), तानबाजी थूल (62), सुशीला थूल (45), सचिन पिसे, रमेश थूल, जानराव थूल, सुनील थूल आणि अन्य एक अशा 10 जणांचा या अपघातात मृत्यू झाला.

या अपघातात जखमींना सुरुवातीला कळंब ग्रामीण रुग्णालय आणि नंतर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जखमींपैकी काहींना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील मृताच्या वारसांना सरकारकडून दोन लाख रुपये, तर जखमींना एक लाख रुपयांची मदत पालकमंत्री मदन येरावार यांनी जाहीर केली आहे.

अपघातातील मृतांवर पार्डी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर 7 जणांना अग्नी देण्यात आला. आज संपूर्ण पारडी गावात चूल पेटली नाही. सात मृतदेह गावात येताच एकच टाहो फोडला. गावातील बौद्ध विहारसमोर सातही मृतदेह ठेवून वंदना करण्यात आली आणि नंतर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.