शाहीन बागेत गोळीबार करणारा आरोपी पत्रकारितेचा विद्यार्थी

| Updated on: Feb 01, 2020 | 11:40 PM

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून शाहीन बागेत आंदोलन सुरु आहे. मात्र, हे आंदोलन थांबावं यासाठी एका तरुणाकडून आज हवेत गोळीबार करण्यात आला (Man fired bullets in shaheen bagh).

शाहीन बागेत गोळीबार करणारा आरोपी पत्रकारितेचा विद्यार्थी
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीच्या शाहीन बागेत एका तरुणाने हवेत गोळाबार केला. शाहीन बागेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरु होतं. ते आंदोलन संपवण्यासाठी त्याने गोळीबार केला. यात मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पकडला गेला. पोलिसांनी त्याला अटक केली. हा तरुण पकारितेचा विद्यार्थी होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

दिल्लीच्या शाहीन बागेत गोळीबार करणारा आरोपी कपिल गुर्जरचं पत्रकार बनण्याचं स्वप्न होतं. त्याने त्यासाठी पत्रकारितेचं शिक्षण देखील सुरु केलं. मात्र, एक वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्याचं शिक्षणात मन लागलं नाही आणि त्यानं शिक्षण सोडलं. त्यानंतर तो वडिलांना व्यवसायात मदत करु लागला. शनिवारी (1 फेब्रुवारी) दुपारी जेवून तो घराबाहेर पडला. त्यावेळी बाहेर जातो, असं त्याने घरी सांगितलं होतं. मात्र, संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास टीव्हीवर कपिलने शाहीन बागेत गोळीबार केल्याची माहिती आली तेव्हा त्याच्या कुटुंबियांना धक्काच बसला. तो दिल्लीच्या दल्लूपूरा गावाचा रहिवासी आहे. त्याची गोळाबाराची बातमी कळताच गावात एकच खळबळ उडाली.

शाहीन बागेत पुन्हा हवेत गोळीबार, तरुणाला अटक

“कपिलने तीन-चार वर्षांपूर्वी दिल्लीत बारावीचं शिक्षण घेतलं होतं. बारावी पास झाल्यानंतर त्याने मास कम्युनिकेशनच्या बी.ए. चं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र, एका वर्षात त्याने पत्रकारितेचं शिक्षण सोडून दिलं. तेव्हापासून तो आमच्यासोबत दुधाच्या व्यवसायात वडील आणि आम्हाला मदत करत आहे”, अशी माहिती आरोपी कपिलचा मोठा भाऊ सचिनने दिली.

“कपिल दुपारी जेवून घराबाहेर पडला होता. तो कुठे गेला ते आम्हाला ठावूक नव्हतं. संध्याकाळी गावातील काही मुलं धावत आली आणि त्यांनी याबाबत माहिती दिली. कपिलने शाहीन बागेत गोळीबार केला हे ऐकताच त्याच्याजवळ पिस्तूल कुठून आली? आणि तो शाहीन बागेत कसा आणि कुणासोबत गेला? असे दोन प्रश्न मनात आले”, असं कपिलच्या वडीलांनी सांगितलं.