मुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित

| Updated on: Aug 24, 2019 | 4:46 PM

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित
Follow us on

बुलडाणा :  मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलकापूर इथे दिली. यावेळी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यापूर्वी महापुरामुळे महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. या यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून धुळे नंदूरबारपासून सुरु झाला. मात्र आज अरुण जेटलींचं निधन झाल्याने पुन्हा एकदा ही महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

महाजनादेश यात्रा आज जळगावच्या जामनेर येथून मलकापूरमध्ये आली. तेव्हा कुठलेही स्वागत न स्वीकारता सरळ मुख्यमंत्री स्टेजवर पोहोचले.  त्यानंतर त्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पुढील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या निधनाने फार मोठी हानी झाल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. भ्रष्टाचाराचा डाग न लागलेले नेते म्हणून जेटली यांची कारकीर्द होती, ते निष्णात वकील  होते, अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अवघ्या 9 मिनिटात आपले भाषण आटोपून फडणवीस रवाना झाले.