दोन वर्षाच्या चिमुकलीचा पाण्याने भरलेल्या टपात पडून दुर्दैवी मृत्यू

| Updated on: Feb 24, 2020 | 11:21 PM

लासलगाव जवळील ब्राह्मणगाव (विंचूर) येथे बाथरुमजवळ पाण्याने भरलेल्या टपात पडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Death of girl due to fall in water tank).

दोन वर्षाच्या चिमुकलीचा पाण्याने भरलेल्या टपात पडून दुर्दैवी मृत्यू
Follow us on

नाशिक : लासलगाव जवळील ब्राह्मणगाव (विंचूर) येथे बाथरुमजवळ पाण्याने भरलेल्या टपात पडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Death of girl due to fall in water tank). या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ब्राह्मणगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलीचे नाव गीता खंडू गवळी असं आहे.

ब्राह्मणगावच्या (विंचूर) गायत्री आणि खंडू गवळी यांना दोन लहान मुली होत्या. त्यातील पहिली मुलगी ही पाच वर्षांची आहे. तिचं ज्ञानेश्वरी असं नाव आहे. ज्ञानेश्वरीच्या जन्मानंतर तीन वर्षांनी लहान मुलगी गीताचा जन्म झाला. या दोन्ही मुली गवळी कुटुंबात अतिशय लाडक्या होत्या. दोन्ही मुली अंगणात खेळत, टीव्हीवर आणि मोबाईलवर सिनेमातील एखादं गाणं सुरु झालं की त्यावर नाचत, त्यामुळे गवळी कुटुंबामध्ये मोठं आनंदाचे वातावरण होतं. मात्र आज (24 फेब्रुवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन वर्षाची चिमुकली गीताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

ब्राह्मणगाव येथे पाच ते आठ दिवसाआड नळाला पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे घरातील लहान-मोठे संपूर्ण भांड्यांमध्ये पाण्याचा साठा केला जातो. आज सकाळी पाणी आले. त्यामुळे घरातील सर्व भांड्यांमध्ये पाणी भरण्यात आले. घराबाहेरील बाथरुमजवळ 25 लिटरचा टपही पाण्याने भरण्यात आला होता. दरम्यान, गीताच्या आईचे घरातील काम सुरु असताना गीता ही एकटीच खेळत होती. ती खेळताना घराबाहेर असलेल्या बाथरुमजवळ गेली. टपात असलेल्या पाणीसोबत खेळत असताना चिमुकल्या गीतेचा तोल गेला आणि ती टपात पडली. यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याने तिचा टपातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली (Death of girl due to fall in water tank).

गीताच्या आईला याची साधी कल्पनाही नव्हती. गीताचा आवाज येत नसल्याने आई तिला शोधू लागली. मात्र गीता कुठेही दिसली नाही. अखेर गीताला शोधताना ती आरडाओरड करु लागली. यावेळी घराच्या शेजारच्यांनीदेखील गीताला शोधायला सुरुवात केली. त्यावेळी बाथरुमजवळ असलेल्या टपात गीताचे पाय दिसले. तिला टपातून बाहेर काढण्यात आले. यावेळी तिची हालचाल बंद झाली होती. तिला तत्काळ लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण आहेर यांनी तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी चिमुकल्या गीताला मृत्यू झाल्याची घोषणा केली. या घटनेमुळे गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ब्राह्मणगावतही या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोन वर्षाच्या गीताच्या पार्थिवाचे शवविच्छेदनानंतर अंत्यविधी करण्यात आला.