मोदींचा डाव यशस्वी, संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानकडूनही भारताचं समर्थन

| Updated on: Jun 26, 2019 | 5:00 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण आणि भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांनी अशी परिस्थिती निर्माण केली की पाकिस्तानलाही भारताचं समर्थन करावं लागलं. 15 सदस्यीय परिषदेत 2021-22 च्या कार्यकाळासाठी 5 अस्थायी सदस्यांची निवड 2020 च्या आसपास होणार आहे. या सदस्यांचा कार्यकाळ 2021 पासून सुरु होईल.

मोदींचा डाव यशस्वी, संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानकडूनही भारताचं समर्थन
Follow us on

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) दोन वर्षांच्या अस्थायी सदस्यत्वासाठी आशिया-प्रशांत समुहाने सर्वानुमते भारताचं समर्थन केलंय. भारतासाठी हा मोठा डिप्लोमॅटिक विजय मानला जातोय. जागतिक व्यासपीठावर भारताचं महत्त्व वाढल्याचं या विजयाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण आणि भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांनी अशी परिस्थिती निर्माण केली की पाकिस्तानलाही भारताचं समर्थन करावं लागलं. 15 सदस्यीय परिषदेत 2021-22 च्या कार्यकाळासाठी 5 अस्थायी सदस्यांची निवड 2020 च्या आसपास होणार आहे. या सदस्यांचा कार्यकाळ 2021 पासून सुरु होईल.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी मंगळवारी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली. सर्वानुमते निर्णय झाला. आशिया-प्रशांत समुहाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 2021-22 या दोन वर्षांच्या अस्थायी कार्यकाळासाठी भारताच्या उमेदवारीचं समर्थन केलं. सर्व 55 सदस्यांचे समर्थन दिल्याबद्दल आभार मानतो, असं अकबरुद्दीन म्हणाले.

पाकिस्तानसह 55 देशांचं भारताला समर्थन

भारताच्या उमेदवारीचं समर्थन करणाऱ्या 55 देशांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, चीन, इंडोनेशिया, ईराण, जपान, कुवैत, किर्गिजस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, कतर, सौदी अरेबिया, श्रीलंका, सीरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.

काय आहे अस्थायी सदस्य?

जगभरातील सुरक्षेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या UNSC मध्ये अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटेन हे पाच स्थायी सदस्य आहेत. पण दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी संयुक्त राष्ट्राच्या सभेत 193 सदस्यांच्या पाठिंब्याने 10 अस्थायी सदस्यांची निवड केली जाते. या अस्थायी सदस्यांचं वितरण क्षेत्रीय आधारावर करण्यात आलं आहे. आफ्रिका आणि आशियासाठी 5, तर पूर्व युरोपच्या वाट्याला एक, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन क्षेत्रासाठी दोन आणि पश्चिम युरोपच्या वाट्याला दोन जागा आहेत.

अस्थायी सदस्य म्हणून भारताला यापूर्वीही मान मिळाला आहे. 1950-51, 1967-68, 1972-73, 1977-78, 1984-85, 1991-92 आणि 2011-12 मध्येही भारताला अस्थायी सदस्य होण्याचा मान मिळाला होता. या महिन्याच्या सुरुवातीला इस्टोनिया, नायजर, सेंट विन्सेंट अँड द ग्रेनाडिन्स, ट्युनिशिया आणि व्हिएतनाम यांची दोन वर्षांसाठी अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या देशांचा कार्यकाळ 2021 मध्ये सुरु होईल. सेंट विन्सेंट अँड द ग्रेनाडिन्स हा UNSC मध्ये सदस्यत्व मिळवणारा सर्वात छोटा देश आहे.