डॉ. कलाम यांना पुन्हा राष्ट्रपती बनायचं होतं, पण काँग्रेसने साथ दिली नाही!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : 2012 मध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या पाठिंब्याने पुन्हा राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सहभागी होण्याची माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची इच्छा होती. पण काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष साथ देत नसल्याचं पाहून त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली. एका पुस्तकात हा दावा करण्यात आलाय. इतिहासकार राजमोहन गांधी यांनी लिहिलेल्या ‘मॉडर्न साऊथ इंडिया: अ हिस्ट्री […]

डॉ. कलाम यांना पुन्हा राष्ट्रपती बनायचं होतं, पण काँग्रेसने साथ दिली नाही!
Follow us on

मुंबई : 2012 मध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या पाठिंब्याने पुन्हा राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सहभागी होण्याची माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची इच्छा होती. पण काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष साथ देत नसल्याचं पाहून त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली. एका पुस्तकात हा दावा करण्यात आलाय. इतिहासकार राजमोहन गांधी यांनी लिहिलेल्या ‘मॉडर्न साऊथ इंडिया: अ हिस्ट्री फ्रॉम दी 17th सेन्चुरी टू अवर टाइम्स’ या पुस्तकात हा किस्सा सांगण्यात आलाय.

डॉ. कलाम राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून बाहेर झाल्यानंतर काँग्रेसने वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून निवड केली आणि त्यांनी भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 2007 ते 2012 या काळात राष्ट्रपती असलेल्या प्रतिभा पाटील यांची त्यांनी जागा घेतली होती.

”डॉ. कलाम यांचा कार्यकाळ 2007 साली संपला होता. या वर्षी राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर त्यांचा भारतीय पुरातन संस्कृतीविषयीचा उत्साह, हिंदू संघटनांकडून केलं जाणारं कौतुक आणि भारतीय संरक्षण क्षेत्रातील योगदान यामुळे कलाम हे हिंदू भारतातले लोकप्रिय मुस्लीम बनले होते,” असं या पुस्तकात लिहिलं आहे.

राजमोहन गांधी पुढे लिहितात, “भाजप आणि तृणमूल काँग्रेससह इतर काही पक्षांनी 2012 साली डॉ. कलाम यांच्यासमोर राष्ट्रपतीपदासाठी प्रस्ताव ठेवला होता आणि ते तयारही होते. पण काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना हा विचार पटला नाही. संख्याबळाची कमी असल्यामुळे कलाम निवडणूक लढले नाही”.

“समाजवादी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी 2002 साली के. आर. नारायणन यांची जागा घेण्यासाठी कलाम यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री राहिलेले मुलायम यांची डीआरडीओचे प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या कलाम यांच्याशी चांगली ओळख होती,” असंही पुस्तकात म्हटलं आहे.

डॉ. कलाम यांनी के. आर. नारायणन यांच्यानंतर राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. 2002 ते 2007 या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते. ते देशातले सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती ठरले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात भारतीय स्वतंत्रता संग्राम पक्षाच्या नेत्या लक्ष्मी सेहगल होत्या. पण या एकतर्फी लढतीत कलाम यांचा विजय झाला. सर्व पक्षांनी कलाम यांना पाठिंबा दिला होता.

डॉ. कलाम यांना केंद्र सरकारने 1981 साली देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण आणि नंतर 1990 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार दिला. तर 1997 मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे कलाम हे देशाचे केवळ तिसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या अगोदर हा सन्मान सर्वपल्ली राधाकृष्णन आणि झाकीर हुसैन यांना मिळाला होता. 27 जुलै 2015 रोजी डॉ. कलाम यांचं निधन झालं.