कोल्हापूर-सांगलीत महापूर, सोलापुरात भीषण दुष्काळ

| Updated on: Aug 09, 2019 | 8:53 AM

राज्याच्या एका भागात पावसाने हाहा:कार माजवलेला असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात पाणीबाणी सुरु आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचेही मोठं नुकसान झालं आहे.

कोल्हापूर-सांगलीत महापूर, सोलापुरात भीषण दुष्काळ
Follow us on

सोलापूर : राज्याच्या एका भागात पावसाने हाहा:कार माजवलेला असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात पाणीबाणी सुरु आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचेही मोठं नुकसान झालं आहे. उन्हाळ्यात कसेबसे दिवस काढले मात्र पावसाळ्यात पाऊसच नसल्याने गावातले लोक आता शहराची वाट धरत आहेत. नुकसान झाल्यामुळे शेतकरीही चिंतेत आहे.

गेल्यावर्षीही पाऊस झाला नाही त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागला. पण पावसाळ्यातही पाऊस न झाल्याने सोलापूरमधील कासारी गावात पाण्याचा तुटवडा भासत आहे. पाणी नसल्यामुळे गावातील प्रत्येकजण सायकलीवरुन काही किलोमीटर लांब जाऊन पाणी भरत आहेत. विशेष म्हणजे जिथे जनावरसुद्धा पाणी पीत नाही तिथे गावातल्या रहिवाशांना पाणी प्यावे लागत आहे.

पाणी नसल्यामुळे आबालवृद्धांचे हाल होत आहेत. गेल्यावर्षी पाऊन न झाल्याने गावात पाण्याचा तुटवडा भासू लागला. यावर्षीही पाऊन नसल्यामुळे गावकऱ्यांची परिस्थिती बेताची झाली आहे. शेतकऱ्यांनी पाऊस येईल यामुळे पेरणीसाठी रान तयार करुन ठेवलं होते. मात्र समाधान कारक पाऊस न आल्याने त्यांचे स्वप्न भंगलं आहे.

जिल्ह्याचे वरदान समजले जाणारे उजनी धरण पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे भरलं आहे. ही बाब समाधानाची असली तरी ते पाणी उन्हाळ्यात शहरासाठी शिल्लक ठेवले जाते. त्यामुळे गाव शिवारात त्याचा काही एक उपयोग होत नाही.

दरम्यान, राज्यातील कोल्हापूर, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, रायगड, बारामतीमध्ये नद्यांना पूर आल्यामुळे सर्वत्र पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. तर काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.