पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक

| Updated on: Jun 10, 2019 | 7:50 PM

एनएबीच्या 15 सदस्यीय टीमने ही कारवाई केली. पीपीपीचे अध्यक्ष आणि झरदारी यांचे चिरंजीव बिलावल भुट्टो यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी यांना बनावट बँक अकाऊंटप्रकरणी अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद हायकोर्टाने झरदारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर काही तासातच नॅशनल अकाऊंटीबिलीटी ब्युरो म्हणजेच एनएबीकडून झरदारी यांना अटक करण्यात आली. एनएबीच्या 15 सदस्यीय टीमने ही कारवाई केली. पीपीपीचे अध्यक्ष आणि झरदारी यांचे चिरंजीव बिलावल भुट्टो यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, झरदारी आणि त्यांची बहीण फरियाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज फेटाळण्यात आला. अर्ज फेटाळताच एनएबीचा ताफा झरदारी यांच्या घरी दाखल झाला आणि अटक केली. यावेळी झरदारी यांच्या घराकडे जाणारा प्रत्येक रस्ता बंद करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

पाकिस्तानमध्ये बनावट बँक अकाऊंट उघडून 4.4 अब्ज डॉलरचा संशयास्पद व्यवहार झालाय. याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार, हे अकाऊंट मेमर्स ए वन इंटरनॅशनलच्या नावावर आहे, जे बनावट अकाऊंट आहे. या बनावट अकाऊंटमधून 4.4 अब्ज डॉलर पाठवण्यात आले, ज्यापैकी 3 कोटी रुपये झरदारी ग्रुपला दोन वेगवेगळ्या टप्प्यात पाठवण्यात आले.

कोण आहेत आसिफ अली झरदारी?

झरदारी हे 2008 ते 2013 या काळात पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. त्यांच्या पत्नी बेनझीर बुट्टो या 1988 मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानही होत्या. त्यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बुट्टो यांचं सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. पण त्यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवली. गेल्या अनेक वर्षांपासून झरदारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. आपण तुरुंगात जाण्यासाठी कधीच घाबरत नाही, तुरुंग हे माझं दुसरं घर आहे, मी आतापर्यंत 11 वर्ष तुरुंगात काढले आहेत, असं झरदारी एकदा म्हणाले होते.