शिर्डीत तुफान गर्दी, व्हीआयपी पास बंद, चंद्रग्रहणामुळे रात्री मंदिर बंद

| Updated on: Jul 16, 2019 | 10:59 AM

साईनगरी शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांना गुरू मानणारे हजारो साईभक्त आज बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत.

शिर्डीत तुफान गर्दी, व्हीआयपी पास बंद, चंद्रग्रहणामुळे रात्री मंदिर बंद
Follow us on

अहमदनगर : साईनगरी शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांना गुरू मानणारे हजारो साईभक्त आज बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. गुरुपौर्णिमेनिमत्त साईमंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. शिर्डीत तुडूंब गर्दी झाल्याने व्हीआयपी पाससेवा बंद करण्यात आली. वाढलेल्या गर्दीमुळे साई संस्थानने हा निर्णय घेतला.

आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा. राज्यभरात अनेक ठिकाणी हा गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. शिर्डीतही साईबाबांच्या हयातीपासून सुरु झालेला गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो आहे. तीन दिवस हा उत्सव शिर्डीत सुरु असतो.

आज सकाळी बाबांच्या काकड आरतीने उत्सवाच्या मुख्य दिवसाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर साईबाबांच्या पादुका आणि फोटोची मिरवणूक निघाली. साईनामाच्या जयघोषाने शिर्डीनगरी दुमदुमली असून अतिशय भक्तीमय वातावरण आहे.

साई संस्थानकडून भक्तांच्या सुविधेसाठी अतिरिक्त निवास व्यवस्था, भोजन प्रसाद, सुरक्षेच्या काळजीसह दर्शनासाठी उत्तम व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेतील एका साईभक्ताच्या देणगीतून साईमंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात सजवण्यात आले आहे, तर मुंबईतील द्वारकामाई भक्त मंडळाने साईमंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

उत्सवाच्या मुख्य दिवशी साईमंदिर दरवर्षी रात्रभर उघडे ठेवण्यात येते. मात्र आज चंद्रग्रहण असल्याने रात्री साईबाबांची शेजारती झाल्यानंतर साईमंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे दरवर्षी मध्यरात्री दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आज दिवसभरातच बाबांचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

अक्कलकोटमध्येही गर्दी

स्वामींची नगरी असलेल्या अक्कलकोटमध्येही गुरुपौर्णिमाचा उत्साह आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात आज  पहाटेपासूनच  भक्तांनी दर्शनासाठी  गर्दी केली.  “अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्री स्वामी महाराज की जय” च्या जयघोषात अक्कलकोट नागरी दुमदुमून गेली आहे.

शेगावात भक्तांची मांदियाळी

गुरुपौर्णिमेनिमत्त विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. जे भाविक संत श्री गजानन महाराजांना गुरु मानतात, ते आज महाराजांच्या दर्शनाकरता शेगावी येतात. त्यामुळे शेगावात आज गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आज दुपारी दोननंतर चंद्रग्रहणामुळे महाराजांचे दर्शन बंद होणार आहे.