नव्या वर्षात घर घ्यायचा विचार करताय? ही गुड न्यूज वाचा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली : नव्या वर्षात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहत असलेल्या प्रत्येकासाठी गुड न्यूज आहे. 6 ते 18 लाख रुपये वार्षिक कमाई असेल तर मार्च 2020 पर्यंत गृहकर्जावर अनुदानासाठी अर्ज करु शकता. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही घोषणा केली. मध्यमवर्गीय गटातील लोकांसाठी असलेल्या क्रेडिट लिंक्ड सबसिडीला भरघोस प्रतिसाद मिळालाय आणि या वर्षाअखेरपर्यंतच […]

नव्या वर्षात घर घ्यायचा विचार करताय? ही गुड न्यूज वाचा
Follow us on

नवी दिल्ली : नव्या वर्षात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहत असलेल्या प्रत्येकासाठी गुड न्यूज आहे. 6 ते 18 लाख रुपये वार्षिक कमाई असेल तर मार्च 2020 पर्यंत गृहकर्जावर अनुदानासाठी अर्ज करु शकता. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही घोषणा केली. मध्यमवर्गीय गटातील लोकांसाठी असलेल्या क्रेडिट लिंक्ड सबसिडीला भरघोस प्रतिसाद मिळालाय आणि या वर्षाअखेरपर्यंतच एक लाख लोकांनी अर्ज केलाय, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर 2016 रोजी घरासाठी मध्यमवर्गीयांना दिलासा देत, व्याजामध्ये सूट देण्याची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 2.67 लाख रुपयांपर्यंत अनुदान थेट खात्यात जमा केलं जातं. ज्यामुळे बँकेच्या कर्जाचा भार आणखी हलका होतो.

अनुदान योजना 31 मार्च 2019 रोजी संपणार होती. पण याची वैधता आणखी एक वर्षासाठी म्हणजे मार्च 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मध्यमवर्गीयांना गृहकर्जाच्या व्याजावर तीन ते 6.5 टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जातं. आतापर्यंत 3.14 लाख लाभार्थ्यांना गृहकर्जावर 69 हजार कोटी रुपयांचं अनुदान दिलं असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं.

2018 या वर्षात 93007 अर्जदारांना योजनेचा लाभ मिळाला. अनुदानाची रक्कम या सर्वांच्या खात्यात जमा करण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील प्रत्येक व्यक्तीला 2022 पर्यंत हक्काचं घर उपलब्ध करुन देण्याचं उद्दीष्ट सरकारने ठेवलं आहे. सध्या लाखो घरांचं काम सुरु आहे, तर लाखो घरांचं वाटप पूर्ण झाल्याचंही हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं.

घर घेताना अर्ज कसा कराल?

नवीन घर घेताना बँकेकडून जेव्हा कर्जाची विचारणा करत असाल, तेव्हाच या योजनेबद्दलही बँकेला विचारणा करा. बँकेकडून यासाठी एक फॉर्म दिला जातो, ज्यावर प्रतिज्ञापत्रासह माहिती भरुन तो फॉर्म बँकेत जमा करावा लागतो. काही महिन्यांमध्येच हे अनुदान कर्जदाराच्या खात्यावर जमा केलं जातं.