पुढील पाच दिवस या भागात पावसाची शक्यता, पण मराठवाड्याकडे पाठ

| Updated on: Jul 08, 2019 | 5:26 PM

कोकण आणि गोव्यात पाच दिवस सर्वदूर पाऊस असून अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भात दोन दिवस अनेक ठिकाणी सर्वत्र पाऊस पडेल. तर उद्यापासून हलका पाऊस पडेल.

पुढील पाच दिवस या भागात पावसाची शक्यता, पण मराठवाड्याकडे पाठ
नाशिक गोदावरीला पूर.
Follow us on

मुंबई : राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. मात्र पुढील दोन दिवस मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. म्हणजेच सोमवारपासून तीन दिवस मुंबईत अतिवृष्टी होणार आहे. तर कोकण आणि गोव्यात पाच दिवस सर्वदूर पाऊस असून अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भात दोन दिवस अनेक ठिकाणी सर्वत्र पाऊस पडेल. तर उद्यापासून हलका पाऊस पडेल.

भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या अंदाजानुसार, कोकण, गोवा आणि मुंबईसह उपनगरांत अतिवृष्टी होईल. पुढील दोन दिवस मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबईत 25 सेंटीमीटर पाऊस पडेल. तर 11 आणि 12 तारखेला मुंबई आणि उपनगरात पाऊस थोडा कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रात 24 तासात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. त्याचबरोबर पुण्यातही आज आणि उद्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. बुधवारी दहा तारखेला थोडा पाऊस कमी होईल. त्यानंतर पुढील तीन दिवस पाऊस कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दुसरीकडे मोठ्या पावसाची प्रतीक्षा असलेल्या मराठवाड्यात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही.

मराठवाड्यातील आतापर्यंतचा सरासरी पाऊस – 13 टक्के

औरंगाबाद – 19.2

जालना – 16.9

परभणी – 12.5

हिंगोली – 10.6

नांदेड – 9.6

बीड – 12.5

लातूर – 12.3

उस्मानाबाद – 12.9

मुंबई, नवी मुंबईत मुसळधार

गेले दोन दिवस विश्रांती दिलेल्या पावसाने मुंबईत आज पुन्हा जोरदार हजेरी लावली. पहाटेपासून रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सकाळी 8 नंतर मोठं रुप धारण केलं. कामावर जाण्याच्या वेळीच पावसाच्या मोठमोठ्या सरी बरसू लागल्याने अनेकांचा खोळंबा झाला. दादर, शीव, कुर्ला, माटुंगा, लोअर परेल भागात जोरदार पाऊस कोसळला. मोठ्या पावसामुळे सखल भाग असलेल्या दादर, हिंदमाता, परळ यासारख्या काही भागात पाणी साचलं. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवरही पाहायला मिळाला. जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली असताना, सकाळी सकाळी विमान वाहतुकीवरही परिणाम झाला. साडेनऊच्या सुमारास विमानाची उड्डाणं रोखण्यात आली.

नवी मुंबईत पावसाने रौद्ररुप धारण केलं आहे. सायन-पनवेल महामार्गावर अक्षरश: गाड्या वाहून जाण्यासारखी परिस्थिती आहे. खारघर, बेलापूरमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत वाहने आगेकूच करत आहेत.